पर्यटनाला चालना न देणाऱ्या क्लब्स आणि पंचतारांकित हॉटेल्सवर कारवाई करावी, अशी मागणी गुरुवारी स्थायी समितीत करण्यात आली. अनेक हॉटेल आणि क्लबने पर्यटनाला चालना देण्याच्या नावाखाली जादा चटईक्षेत्र वापरले होते. पण नंतर त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आले आहे.
पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबईतील अनेक पंचतारांकित हॉटेल आणि क्लबना सरकारने पर्यटन विकास क्षेत्राचा दर्जा दिला होता. त्यामुळे त्यांनी जादा चटईक्षेत्र घेऊन वाढीव बांधकाम केले होते. परंतु पर्यटनाला वाव देण्याच्या दृष्टीने काहीच योजना केल्या नाहीत, असे पालिका सभागृह नेते यशोधर फणसे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत निदर्शनास आणून दिले. त्यामुळे अशी पंचतारांकित हॉटेल आणि क्लबवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. कल्बच्या मैदानाचा खासगी वापर होत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. ही मैदाने जनतेसाठी खुली करण्याची तरतूद करण्यात आली होती. याप्रकरणी पालिकेचे विकास नियोजन प्रमुख अभियंते राजीव कुकनूर लपवाछपवी करत असल्याचा आरोपही फणसे यांनी केला