दीपावली संपताच महावितरणने पुन्हा रात्रीच्या अन्यायकारक व जाचक भारनियमनाचा खाक्या पुन्हा सुरू केल्याने दिवाळीनिमित्त उत्साहाने गजबजलेली बाजारपेठ पुन्हा ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. येत्या १९ नोव्हेंबरपासून लग्नसराई सुरू होत असून व्यापाऱ्यांनी त्यासाठी पूर्वतयारी करून ठेवली, पण त्यावर भारनियमनाचे विरजण पडल्याने अस्वस्थता निर्माण झाली आहे.
दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर, मनमाड शहरात एक ते सात नोव्हेंबर या कालावधीत भारनियमन बंद करण्यात आले होते. मात्र, महावितरणने बुधवारपासून शहरात पुन्हा सकाळ, दुपार व रात्री असे तीनवेळा एकूण साडे सात तासांचे भारनियमन पुन्हा सुरू केले आहे. दोन दिवस आधीच भारनियमन सुरू करून महावितरणने दिवाळी संपल्याचा जोरदार झटका दिला आहे. दिवाळीच्या काळात केवळ पाच दिवस भारनियमनातून अधिकृत मुक्ती मिळाली. तरीही अनधिकृतरित्या दिवाळीतही अनेकदा वीज पुरवठा खंडित झाला. दिवाळीपूर्वी भाजप-शिवसेना व काँग्रेसच्या शिष्टमंडळाने महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन, घेराव घालून भारनियमन बंद करण्याची मागणी केली होती. पण, अखेर शासन स्तरावरून कायदा व सुव्यवस्थेच्या कारणाने दिवाळीसाठी भारनियमन रद्द करण्यात आले. पण, हा आनंद जेमतेम सणापुरता पाच दिवस टिकला. भारनियमन कायमस्वरूपी रद्द व्हावे यासाठी पुन्हा नव्याने सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले जाणार असल्याचे माजी नगराध्यक्ष रहेमान शाह यांनी म्हटले आहे. तर दिवाळीनिमित्त राज्यात केवळ ५ नोव्हेंबपर्यंत भारनियमन स्थगित करण्यात आले होते. ग्रामीण भागातही फिडरनिहाय भारनियमन सुरू आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत भारनियमन ठरल्याप्रमाणे सुरू राहील, असे महावितरणचे कार्यकारी अभियंता विनोद सोनकुसळे यांनी सांगितले.