सिडकोने नवी मुंबईच्या उभारणीसाठी ठाणे, उरण तसेच पनवेल तालुक्यातील ९५ गावांच्या जमिनी संपादित केलेल्या असून, या गावातील तरुणांना रोजगार मिळावा याकरिता सिडकोने पुणे येथील एमआयडीसी फायरमन संस्थेच्या माध्यमातून ४५ गावांतील ८७ तरुणांना सहा महिन्यांचे फायरमनचे प्रशिक्षण दिलेले आहे. त्यानंतर त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. या तरुणांना सिडकोने आपल्या अग्निशमनदलात सामावून घेण्यात यावे, या मागणीसाठी सिडको प्रकल्पग्रस्त संघटनेच्या वतीने सोमवारी ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता सिडको भवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
 नवी मुंबई शहराच्या उभारणीसाठी येथील शेतकऱ्यांच्या सर्व जमिनी गेल्याने ४३ वर्षांनंतरही सिडकोचे प्रकल्पग्रस्त संपूर्ण पुनर्वसनापासून वंचित आहेत. या विरोधात गेली अनेक वर्षे प्रकल्पग्रस्त तसेच स्थानिकांची आंदोलनेही सुरू आहेत. सिडकोचा विस्तार होत असताना सिडकोने प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन म्हणून सिडको प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना विविध प्रकारच्या रोजगार तसेच स्वयंरोजगाराला सहाय्यभूत ठरणारे प्रशिक्षण देण्यासाठी नवी मुंबईत प्रशिक्षण केंद्रही सुरू केली आहेत. यामध्ये २०१३-१४ या वर्षांत प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना फायरमनचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. फायरमनचे प्रशिक्षण घेतलेले तरुण बेरोजगार असून त्यांना सिडकोने आपल्या नवी मुंबईतील अग्निशमन दलात सामावून घेण्याची मागणी मोर्चात करण्यात येणार आहे, अशी माहिती सिडको प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष भूषण पाटील व कार्याध्यक्ष रामचंद्र म्हात्रे यांनी दिली आहे.