विविध मागण्यांसाठी राजीव गांधी विचार मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी नागपूर सुधार प्रन्यासच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. नागपूर सुधार प्रन्यास बरखास्त करण्यात यावे, अशी मागणी करून आंदोलकांनी कार्यालया समोरील रस्त्यावर ठिय्या आंदोलन केल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली.
नागपूर सुधार प्रन्यासने १६ रुपये दराने विकास शुल्क आकारावे, रजिस्ट्री शुल्क कमी करावे, अविकसित ले आऊटमध्ये जलवाहिनी, मलवाहिनी, रस्ते, विद्युत, शाळा, दवाखाना आदी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या, आदी मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. प्रन्यासमध्ये मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार असून अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली. सकाळी अकरा वाजतापासून अविकसित ले आऊटमधील हजारो नागरिकांनी आंदोलनाला सुरुवात केल्यामुळे एकही अधिकारी आंदोलनाची दखल घेत नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी अचानक रस्त्यावर येऊन वाहतूक रोखून धरली. त्यामुळे पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. सभापतीची येऊन चर्चा करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. मात्र सभापतींनी वेळ नसल्याचे कारण सांगितल्यावर आंदोलक अधिक आक्रमक झाले आणि त्यांनी परिसरात गोंधळ घातला. अधिकाऱ्यांच्या विरोघात घोषणा सुरू असताना पोलिसांनी मध्यस्थी करीत सभापती प्रवीण दराडे यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर आंदोलकांच्या शिष्टमंडळाने दराडे यांच्याशी विविध विषयावर चर्चा करून निवेदन दिले. अ‍ॅडव्हांटेज विदर्भसंदर्भात लवकरच मुंबईत बैठक होणार असून त्यात विकास शुल्क कमी करण्यासंदर्भातील विषय मांडण्याचे आश्वासन दराडे यांनी आंदोलकांना दिले. यावेळी अनिल पांडे, राजू हिंदूस्थानी, रवी बोरकर, केशव धावडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.