वस्तूंमध्ये महत्त्वाच्या असणाऱ्या डिझाईनचे वेगवेगळे प्रकार, त्यामागील तंत्र, अर्थकारण अशा विविध गोष्टी समजून घेण्याची संधी पुणेकरांना मिळाली असून भारती विद्यापीठ, पुणे महानगरपालिका, असोसिएशन ऑफ डिझायनर्स या संस्थांच्या वतीने ‘गुड डिझाईन एक्झिबिशन’ चे आयोजन करण्यात आले आहे.
भारती विद्यापीठ आणि पुणे महानगरपालिकेच्या वतीने पुणे बिनेल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत गुड डिझाईन एक्झिबिशन आयोजित करण्यात आले आहे. १३ जानेवारीपर्यंत पु. ल. देशपांडे उद्यानामध्ये हे प्रदर्शन होणार आहे. डिझाईन्समधील विविध पैलू या प्रदर्शनामध्ये मांडण्यात आले आहेत. रोजच्या वापरामधल्या वस्तूंची, इमारतींची कल्पक डिझाईन्स या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळाणार आहेत. डिझाईन या विषयावर विविध कार्यशाळांचेही आयोजन करण्यात आले आहे. टेराकोटा, बांबू यापासून वस्तू बनवण्याच्या कार्यशाळेचेही आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये स्थानिक कलाकार सहभागींना मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय प्रदर्शने, कार्यशाळा, व्याख्याने अशा अनेक उपक्रमांचे पुणे बिनेलअंतर्गत आयोजन करण्यात आले आहे.