येथील उस्मानिया मशिद परिसरातील एका वृद्ध महिलेच्या घरातील दरोडा आणि संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा छडा लावण्यात अमरावती पोलिसांना यश मिळाले असून, याप्रकरणी मोलकरीण आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे.
मशिदीजवळील वसाहतीत राहणाऱ्या पुतूल बोस (७६) यांचा मृतदेह गुरुवारी सायंकाळी संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. सकृतदर्शनी हे प्रकरण हत्या आणि दरोडय़ाचे असल्याचे सांगण्यात आले होते, पण शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात पुतूल बोस यांचा मृत्यू ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी दरोडय़ाचा तपास सुरू केला होता. पुतूल बोस यांच्याकडे काम करणाऱ्या ज्योती अशोक खानझोडे (२०, रा. हमालपुरा) या मोलकरणीने तिचा प्रियकर शेख शफी उर्फ साहील शेख उस्मान (३७, रा. गुलिस्तानगर) याच्या मदतीने पुतूल बोस यांच्या घरातील दागिने आणि रोख ऐवज लुटण्याचा कट आखला होता. घटनेच्या दिवशी शेख शफी हा पुतूल बोस यांच्या घरात शिरला आणि त्यांना चाकूचा धाक दाखवला, त्यावेळी झालेल्या झटापटीत पुतूल बोस यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, अशी माहिती समोर आली आहे.

शेख शफी आणि ज्योती यांच्यात गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. शेख शफी ऑटोचालक असून तो विवाहित आहे. ज्योती आणि शेख शफी यांची आर्थिक स्थिती बेताचीच असल्याने झटपट पैसा मिळवण्यासाठी दोघांनीही पुतूल बोस यांच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी दुपारी पुतूल बोस त्यांच्या खोलीत आराम करीत असताना शेख शफी ज्योतीसोबत घरात शिरला आणि पुतूल बोस यांना चाकूचा धाक दाखवला. त्या खाली कोसळल्यानंतर त्यांना तसेच टाकून दोघांनी कपाटातील, तसेच पुतूल बोस यांच्या अंगावरील दागिने आणि रोख रक्कम हस्तगत करून पळ काढला. नंतर ज्योती पुतूल बोस यांच्या मुलीकडे कामाला गेली. यावेळी तिने काहीच झाले नाही, असे भासवले. पोलिसांना तिच्या बयाणात विसंगती आढळल्याने संशय बळावला. कसून चौकशी केल्यावर ज्योतीने गुन्ह्याची कबुली दिली. नंतर तिच्या प्रियकरालाही अटक करण्यात आली. पोलीस आयुक्त अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त श्वेता खेडकर, श्रीकांत महाजन, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, संजय धोत्रे यांनी तपासकार्य पूर्ण केले.