विष्णूपुरीत मुबलक पाणी असताना दिग्रसचे पाणी पळविण्याचा अट्टहास कशासाठी? मराठवाडय़ातील जिल्ह्या-जिल्ह्यांत भांडणे लावू नका. अगोदर जायकवाडीत पाणी खेचून आणा, असा सल्ला भाजपचे प्रदेश प्रवक्ते तथा माजी आमदार अॅड. विजय गव्हाणे यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना दिला.
पालमजवळील दिग्रस बंधाऱ्याचे पाणी नांदेडला सोडण्याचा घाट घातला जात आहे. या बंधाऱ्यावर साठ गावांतील शेती अवलंबून आहे. यंदा पाण्याची मुबलकता पाहून सर्वच गावांतील शेतकऱ्यांनी उसाची लागवड केली. नांदेडच्या विष्णूपुरीत ४ टीएमसी पाणी उपलब्ध असताना २६ जानेवारीला दिग्रस बंधाऱ्यातून पाणी सोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, पाणी सोडू देणार नसल्याची भूमिका घेत अॅड. गव्हाणे यांच्यासह जि. प. कृषी सभापती गणेशराव रोकडे यांनी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांची भेट घेऊन पाणी सोडताना पोलीस संरक्षण न देण्याची मागणी केली. या बरोबरच हा निर्णय पुढे ढकलण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हालचाल करावी, या साठी अॅड. गव्हाणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यामुळे उद्या (रविवारी) पाणी सोडण्याचा निर्णय तात्पुरता स्थगित करण्यात आल्याची माहिती अॅड. गव्हाणे यांनी पत्रकार बठकीत दिली. येत्या बुधवारी (दि. २९) याच प्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांनी बठक बोलविली आहे. नांदेडला विष्णूपुरीसह यलदरी, सिद्धेश्वर येथील पाणी जात आहे. तीनही धरणे शंभर टक्के भरली असताना दिग्रस बंधारा कशाला रिकामा करता? पाणी सोडल्यास येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल, असा इशाराही त्यांनी दिला.