सोलापूर शहर व जिल्ह्य़ातील विविध जिव्हाळ्यांच्या प्रश्नांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर व जिल्हा शाखेचा मेळावा येत्या शुक्रवारी, १८ जानेवारी रोजी शहरातील हेरिटेज लॉनवर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास मनसेचे विधिमंडळातील गटनेते आमदार बाळा नांदगावकर, आमदार वसंत गीते आदी उपस्थित राहणार आहेत.
सध्या जिल्ह्य़ात भीषण दुष्काळी स्थिती असून उजनी धरणात ११४ टक्क्य़ांपर्यंतचा पाण्याचा साठा अवघ्या वर्षभरात नियोजनबाह्य़ पध्दतीने संपविण्यात आला आहे. या परिस्थितीत पुणे जिल्ह्य़ातील धरणांतून पाणी सोडण्याविषयी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळे एकूणच सोलापूर जिल्ह्य़ावर अन्याय होत आहे. यात सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादीची आमदार मंडळी मूग गिळून गप्प बसली आहेत. उजनी धरणात पुणे जिल्ह्य़ातील भीमा-आसखेड धरणातून पाणी सोडावे, कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प मार्गी लावावा आदी मागण्यांकडे सत्ताधारी विशेषत: राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे सोलापूर जिल्ह्य़ाला कोणी राजकीय वाली राहिला नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे या प्रश्नावर मनसेने आक्रमक भूमिका घेण्याचे ठरविल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष भूषण महिंद्रकर यांनी सांगितले.
या मेळाव्यात दुष्काळासह नान्नज माळढोक अभयारण्य, मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील जमिनीवर गरिबांच्या झोपडय़ा उद्ध्वस्त करण्याचा प्रस्ताव, महापालिकेतील भ्रष्ट कारभार आदी प्रश्नांवर मार्गदर्शन होणार आहे. आमदार बाळा नांदगावकर व आमदार वसंत गीते यांच्यासह मनसेचे सरचिटणीस जयप्रकाश बाविसकर व संपर्क अध्यक्ष प्रकाश दरेकर आदी मंडळी उपस्थित राहणार असल्याचे महिंद्रकर यांनी सांगितले.