फेब्रुवारी-मार्चमध्ये होऊ घातलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षा प्रक्रियेत आपण सहभागी असणार नाही याची दक्षता प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी घेतली पाहिजे, असे मत माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या लातूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिलीप सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केले. मंडळाचा कारभार भोंगळ कधीच नसतो, तर आपल्यामुळेच विद्यार्थ्यांना कॉपीसारख्या गैरमार्गाचा अवलंब करावा लागतो, ही बाब शिक्षकांनी दुर्लक्षित करू नये.
लातूर विभागीय मंडळाच्या वतीने ‘गैरमार्गाशी लढा, कॉपीमुक्त परीक्षा’ अभियानांतर्गत मुख्याध्यापक व प्राचार्याची दयानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात संकल्प सभा घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव नन्नावरे, माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब तुपे, उपशिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर मोरे, प्रा. शिवाजी शिंदे, हेमलता घुटे, तानाजी पाटील, प्राचार्य शेख आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यातून खरा आनंद मिळतो. हा आनंद यशाचे माप असते. चांगल्या गुणांनी हे यश प्राप्त होते. चांगले गुण मिळविण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण द्यावे. असे शिक्षण मिळाल्यास विद्यार्थी कॉपी न करता तणावमुक्त वातावरणात परीक्षा देऊ शकतो. हे सर्व शिक्षक व मुख्याध्यापकावर अवलंबून असते याचा विसर पडता कामा नये. पटपडताळणी होऊनही, फौजदारी गुन्हे दाखल करण्याची नोटीस देऊनही आपल्या कामात बदल होत नाही, अशी खंत सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केली.
ज्या शाळांकडे शौचालय, पिण्याची व्यवस्था नाही त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या आदेशानुसार संबंधित शाळांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव नन्नावरे यांनी दिला. अनेक शिक्षकांच्या घरी शौचालये नाहीत, अशा शिक्षकांची नावे मी देऊ शकतो. त्यांनी शौचालये बांधून घ्यावीत, असे आवाहन त्यांनी केले. प्राचार्य, मुख्याध्यापक या वेळी उपस्थित होते.