उरण तालुक्याला वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीचे तीस ते पस्तीस कर्मचारी असून कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या उरण मधील कामगार वसाहतीची दुरवस्था झाल्याने एकही कर्मचारी या वसाहतीत राहत नाही. त्यामुळे ओस पडलेल्या या कामगार वसाहतीतील खोल्यांमधून शेळ्या, मेंढय़ा बांधल्या जात असून या खोल्यांचा शौचालय म्हणून वापर केला जात आहे. 

उरण शहराचा प्रवेशद्वार असलेल्या कोटनाका येथे महावितरण कंपनीचे सब स्टेशन आहे. या सब स्टेशनमधूनच संपूर्ण उरण तालुक्याला वीजपुरवठा केला जातो.
महावितरणची वीज बिलेही याच कार्यालयातून तयार केली जातात. येथील विद्युत वाहिन्यांच्या दुरुस्तीची कामे करणारे, तसेच कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी महावितरण कंपनीने वसाहत उभारलेली आहे. या कामगार वसाहतीत पंचवीसपेक्षा अधिक खोल्या आहेत. या कामगार वसाहतीची दुरुस्ती होत नसल्याने अनेक कर्मचाऱ्यांनी वसाहत सोडून भाडय़ाच्या खोलीत राहणे पसंत केले आहे. त्यामुळे मागीत एक ते दीड वर्षांपासून ही वसाहत ओस पडली आहे.
या ओस पडलेल्या कामगार वसाहतीत सध्या शेजारील मटणाची दुकाने असलेल्या दुकानदारांनी शेळ्या, मेंढय़ा बांधण्यासाठी उपयोग सुरू केला आहे. रात्रीच्या वेळी इतरही प्रकार घडत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र याकडे शेजारीच कार्यालय असताना महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले असून या संदर्भात त्यांच्याकडे विचारणा केली असता आम्ही वसाहत विभागाला कळविणार असल्याचे मत उरणच्या महावितरणचे सहअभियंता उपेंद्र सिन्हा यांनी या वेळी सांगितले.