तंत्रज्ञानात मोठी क्षमता असून स्पध्रेवर वर्चस्व ठेवायचे असेल तर बँकिंगमध्ये होत असलेल्या बदलांकरिता तयार राहणे गरजेचे आहे, असे मत सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष एम. व्ही. टांकसाळे यांनी व्यक्त केले. बँकिंग सुविधांपासून वंचित असलेल्या कोटय़वधी भारतीयांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बँकिंग नेटवर्कमध्ये आणणे शक्य असून हेच मोठे ध्येय भारतीय बँकिंगसमोर असल्याचे त्यांनी सांगितले.
सेंट्रल बँकेच्या नवी मुंबईतील कामोठे शाखेचे उद्घाटन खासदार अनंत गिते यांच्या हस्ते झाले. त्या वेळी टांकसाळे बोलत होते. बँकेचे फिल्ड महाप्रबंधक बी. के. सिघल, ठाणे क्षेत्रीय प्रबंधक सुनील चव्हाण उपस्थित होते.
देशातील तिसरी सर्वात मोठी राष्ट्रीयीकृत बँक असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या देशात ४३२५ शाखा कार्यरत असून सर्व शाखा कोअर बँकिंग प्रणालीने जोडल्या गेल्या आहेत. बँकेच्या संपूर्ण भारतात एकूण ३७५० हून अधिक सूक्ष्म शाखा कार्यरत असून त्यांद्वारे बँकिंग नसलेल्या अतिदुर्गम भागातील जनतेला आíथक समावेशनाचे राष्ट्रीय कर्तव्य सेंट्रल बँक बजावीत असल्याचे टांकसाळे यांनी सांगितले. राष्ट्रीयीकृत बँका उपलब्ध नसलेल्या खेडय़ांमध्ये सेंट्रल बँकेने विशेष मोहीम राबवून सुमारे ३५ लाख लोकांपर्यंत बँकिंग सुविधा देण्याचे फार मोठे कार्य केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बँकिंग सुविधा अधिकाधिक लोकांपर्यंत नेण्यासाठी सेंट्रल बँक कटिबद्ध आहे, असा विश्वास टांकसाळे यांनी व्यक्त केला.