‘दो आँखे बारह हाथ’, ‘कर्मा’ यांसारख्या हिंदी चित्रपटातून आजन्म तुरुंगवास भोगणाऱ्या कैद्यांवर माणुसकी व प्रेमाच्या वर्षांवाने एक वेगळा प्रयोग करण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे. असाच काहीसा प्रयोग पश्चिम बंगाल सरकारने केला असून बंगालमध्ये माँ दुर्गाच्या भक्तीला असणारे अन्यन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन कोलकाता सेंट्रल जेलमधील ५० कैद्यांनी सादर केलेली माँ दुर्गा पूजा उद्या शनिवारी वाशी येथील नवी मुंबई स्पोर्ट्स असोशिएशनच्या मैदानावर संपन्न होणार आहे.
नवी मुंबई बंगाली असोसिएशनच्या वतीने गेली ३२ वर्षे वाशी येथे आगळावेगळा नवरात्रोत्सव साजरा केला जातो. पश्चिम बंगालमध्ये सर्वसाधारणपणे घटस्थापनेनंतर चार दिवसांनी माँ दुर्गा उत्सवाला सुरुवात होते. बंगालमधील दुर्गा पूजन जग प्रसिद्ध आहे. त्यामुळे माँ दुर्गा पूजन न करणारा बंगाली सापडणे तसा दुर्मीळच. यात कैद्यीदेखील अपवाद नाहीत. कोलकाता सेंट्रल जेलमधील ५० कैद्यांनी माँ दुर्गाची गाणी, नृत्य आणि भजन यांचा एक वाद्यवृंद तयार केला असून हा वाद्यवृंद देशात अनेक ठिकाणी जाऊन ही आराधना सादर करणार आहेत. नवी मुंबई बंगाली असोसिएशनच्या आमंत्रणावरुन हे ५० कैद्यी गुरुवारी नवी मुंबईत डेरेदाखल झालेले असून शनिवारी संध्याकाळी ते आपली कलाकृती सादर करणार आहेत. त्यांची ही आगळीवेगळी अदा पाहण्यासाठी मुंबई, नवी मुंबई, पनवेल, ठाणे या परिसरांतून सुमारे दहा हजार बंगाली बांधव येणार असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले. ‘दो आँखे बारह हाथ’, ‘कर्मा’ यांसारख्या चित्रपटातून हा प्रयोग एकच पोलीस अधिकारी करीत असल्याचे दाखविले असले तरी या ठिकाणी मात्र ३०० पोलिसांचा फौजफाटा पश्चिम बंगाल सरकारने पाठविला आहे. त्यामुळे वाशीच्या नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन परिसराला बंगाल पोलिसांच्या बंदोबस्ताचे स्वरूप आलेले आहे. हा प्रयोग हे कैद्यी ठाण्यातदेखील करणार असून त्यांच्या या प्रयोगातून मिळणारे उत्पन्न त्यांच्या उत्कर्षांसाठी खर्च केले जाणार असल्याचे एका बंगाल पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.