* ‘वांद्रे-कुर्ला’ मार्गावर नवी महिला विशेष,
* ३१० क्रमांकाच्या सहा फेऱ्या महिलांसाठी
* महिला विशेष फेऱ्यांची संख्या ६० वर
मुंबई महिलांसाठी सुरक्षित आहे की नाही, अशा चर्चेत सहभागी न होता महिलांना इच्छित स्थळी सुरक्षितपणे सोडण्यासाठी मुंबईत आघाडीवर असलेल्या ‘बेस्ट’ उपक्रमाने महिलांसाठी आणखी खास फेऱ्या सुरू केल्या आहेत. वांद्रे स्थानक पूर्व ते कुर्ला स्थानक पश्चिम या मार्गावरील महिला प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेत ‘बेस्ट’ने या मार्गावरील ३१० क्रमांकाच्या बसच्या सहा फेऱ्या महिला विशेष म्हणून चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या मार्गावरील महिला विशेष किंवा महिलांसाठी प्राधान्य असलेल्या नव्या फेऱ्यांमुळे ‘बेस्ट’च्या महिला विशेष फेऱ्यांची संख्या ६०च्या घरात पोहोचली आहे.
मुंबईत दर दिवशी लाखो महिला कामाच्या निमित्ताने प्रवास करत असतात. ‘बेस्ट’च्या काही मार्गावर सकाळ संध्याकाळी ठरावीक वेळी प्रचंड गर्दी असते. या गर्दीत महिलांना बसमध्ये चढणेही शक्य होत नाही. त्यामुळे ‘बेस्ट’ अशा मार्गावर या गर्दीच्या वेळी महिला विशेष किंवा महिलांना प्राधान्य देणाऱ्या फेऱ्या चालवते. आतापर्यंत ‘बेस्ट’च्या अशा ६० फेऱ्या विविध २५ मार्गावर चालतात.
‘महिला विशेष’ फेऱ्या या फक्त महिलांसाठीच आहेत. तर महिलांना प्राधान्य देणाऱ्या फेऱ्यांमध्ये आधी महिलांना बसमध्ये प्रवेश देण्यात येतो. त्यानंतर जागा असल्यास पुरुषांना प्रवेश मिळतो. आता ‘बेस्ट’ने या दोन्ही प्रकारच्या फेऱ्या वांद्रे पूर्व ते कुर्ला पश्चिम या मार्गावर सुरू केल्या आहेत. यापैकी महिला विशेष फेऱ्या वांद्रय़ावरून सकाळी १०.०५ वाजता आणि आयसीआयसीआय बँक (वांद्रे-कुर्ला संकुल) येथून वांद्रय़ाकडे सायंकाळी सव्वापाच व सव्वासहा वाजता, एमएमआरडीए-कुटुंब न्यायालय येथून कुल्र्याच्या दिशेने सायंकाळी सव्वापाच व सव्वासहा वाजता सुटतील. त्याशिवाय वांद्रय़ावरून कुल्र्याला सकाळी ८.२५ व १०.५७ वाजता सुटणाऱ्या बसमध्ये महिला प्रवाशांना प्राधान्य असेल.
या विशेष बसगाडय़ांशिवाय ‘बेस्ट’मध्ये महिला प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, या दृष्टीने खबरदारी घेतली जाते. अशा प्रकारचा कोणताही त्रास महिला प्रवाशांना होत असल्यास त्या त्वरीत वाहकाकडे तक्रार करू शकतात. तसेच बसगाडी थेट पोलीस ठाण्यातही नेऊ शकतात. मात्र आतापर्यंत तरी अशा घटना क्वचितच घडल्याचे ‘बेस्ट’तर्फे सांगण्यात येते.