अहेरी तालुक्यातील दामरंचा येथील उपसरपंच पत्रू बालाजी दुर्गे (५०) यांची १९ एप्रिलच्या मध्यरात्री नक्षल्यांनी गोळ्या घालून हत्या केली. या घटनेचा भूमकाल संघटनेने तीव्र निषेध व्यक्त केला असून तथाकथित सत्यशोधन करणाऱ्या संघटनांनी दुर्गे यांच्या हत्येचे सत्यशोधन करावे, असे आवाहनही केले आहे.
गडचिरोली जिल्ह्य़ात निवडणुकीची धामधूम सुरू आहे. दुर्गे हे आसपासच्या गावात मान्यता असलेले दलित आंबेडकरी समाजाचे केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिक जाणीव असलेले नेते होते.
दामरंचा-पेरमिली रस्त्याचे बांधकाम तसेच कृषी विकास अशा अनेक गोष्टींबद्दल ते नेहमी गावकरी व अधिकाऱ्यांशी चर्चा करायचे. दामरंचा गाव इंद्रावती नदीकिनारी असल्याने दामरंचा-मांडरा-भंगारामपेठा या भागात उपसा सिंचन योजना होण्यासाठी ते प्रयत्नशील होते. आदिवासीबहूल गडचिरोली जिल्ह्य़ातील अहेरी भागात दलित लोकसंख्या ही प्रगतशील व राजकीयदृष्टय़ा जागृत असून कोणत्याही दडपणाला व दहशतीला बळी न पडणारी आहे.
दलित समाज सुशिक्षित असल्याने बाहेरील जगाच्या संपर्कात आहे. त्यामुळे नक्षली दहशतीचा या समाजावर साधारणपणे फारसा प्रभाव पडत नाही. जास्त प्रभाव जाणवतो तो आदिवासी समाजावर. याचा नीट अभ्यास करून या एका हत्येने संपूर्ण दलित-आंबेडकरी समाजाला धमकी देण्याचा नीट प्रकार नक्षलवाद्यांनी केला आहे.
भूमकाल संघटना या भ्याड हत्येचा निषेध करते. छोटय़ा मोठय़ा कारणासाठी तथाकथित सत्यशोधन करणाऱ्या संघटनांनी दुर्गे यांची हत्या का केली, याचे सत्यशोधन करावे, असे आवाहन संघटनेचे सचिव दत्ता शिर्के यांनी केले आहे.