पूर्व विदर्भातील भाजप उमेदवारांनी मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांवर प्रचारादरम्यान टाकलेल्या अघोषित बहिष्काराचे स्पष्ट सावट असून भाजप नेते हे मित्र नव्हे, तर पाहुणे म्हणून औपचारिकता पाळत असल्याची टीका होत आहे.
भाजप व सेना नेत्यांमध्ये मनसेच्या पैलूने ताणल्या गेलेल्या संबंधाची छाया स्पष्टपणे निवडणुकी दरम्यान दिसून येत आहे. विशेषत: सेना नेते हे भाजप उमेदवारांकडून मिळत असलेल्या वागणुकीतून कमालीचे नाराज झाले असल्याचे दिसून येते.
चंद्रपूर, वर्धा, चिमूर, नागपूर व भंडारा याठिकाणी असलेल्या भाजपच्या उमेदवारांकडून प्रामुख्याने सेना नेते दुखावले गेले आहेत. प्रचाराचे नारळ फ ोडतांना, तसेच निवडणुकीचे अर्ज दाखल करताना सेना नेत्यांना डावलले गेले. मित्रपक्षासह प्रचारासाठी समन्वय समिती गठित करण्याची अपेक्षा बहुतांश ठिकाणी पूर्ण झालेली नाही. मोठय़ा नेत्यांच्या सभेत सन्मानपूर्वक निमंत्रित केले गेले नाही. अशा तक्रारी पुढे येत आहे. जिल्हाप्रमुख रविकांत बालपांडे म्हणाले की, आमचा मित्रपक्ष आम्हाला पाहुण्यांसारखे वागवतो. मित्र म्हणून विश्वास टाकत नसल्याचा अनुभव आहे. वर्धेच्या नरेंद्र मोदींच्या सभेत अगदी वेळेवर पासेस मिळाल्या. अर्ज दाखल करीत असल्याची औपचारिक सूचना देण्यात आली. पण तरीही आम्ही गेलो, पण प्रचाराच्या नियोजनाबाबत अद्याप विचारणा झालेली नाही.
प्राप्त माहितीनुसार, सेना नेत्यांना गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांच्या मतदारसंघात मदत न करता त्यांना पाडण्याचेच प्रयत्न झाल्याचे उघड बोलले गेले. वर्धेत तर हाणामारीही झाली. ती कटुता अद्याप असल्याचे दिसून येते. मुळात भाजप नेत्यांनीही, आले तर तुमच्यासह नाही, तर तुमच्याशिवाय, अशी भूमिका घेतलेली आहे. पूर्व विदर्भ हा भाजपचा गडच राहिला आहे. सेनेने मदत न करताही भाजपने बाजी मारली. भाजप उमेदवार स्वबळावर निवडून येऊ शकतात, असेही भाजपकडून हेतुपुरस्सर दाखविण्याचा प्रयत्न होत असल्याचे सेना नेत्यांना वाटते. सेनेचे ज्येष्ठ नेते आमदार दिवाकर रावते म्हणाले की, असे काही असल्याचे कानावर आलेले नाही.
पूर्व विदर्भाबद्दल मी बोलू शकत नाही, असे स्पष्ट करीत त्यांनी अधिक भाष्य टाळले. नरेंद्र मोदींच्या वर्धेतील सभेत विदर्भातील महायुतीचे दहाही उमेदवार उपस्थित होते. मात्र ही एकी तेवढय़ापुरतीच दिसून आली. त्यानंतर ही मैत्री कागदावरच राहिल्याचे दिसत आहे. भाजपच्या प्रचाराची दुरून गंमत बघण्याचा पवित्रा सेना नेत्यांनी घेतला आहे.