‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ असा गाजावाजा केला जात असला व पूर्वीपेक्षा रक्तदानाचे प्रमाण वाढले असले तरी संपूर्ण विदर्भाला लागेल एवढे रक्त जमा होत नसल्याचे दिसून येत असताना शासन मात्र रक्त गोळा करण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या अत्याधुनिक बसेसला अनुदानच देत नसल्याचे उघडकीस आले आहे.
विदर्भाला अडीच लाख रक्त पिशव्यांची गरज असताना फक्त दोन लाखच रक्त पिशव्या गोळा होतात. त्यामुळे ५० हजार रक्त पिशव्या गोळा करण्यासाठी रक्तदान चळवळीत कार्य करणारे कार्यकर्ते धडपडत असताना शासन मात्र अप्रत्यक्षपणे त्यांना सहकार्यच करत नसल्याचे मेडिकलमधील उदाहरणावरून दिसून येते. चालू आर्थिक वर्षांत अनुदानच मिळाले नसल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल)आदर्श रक्तपेढीची बस गेल्या पाच महिन्यापासून बंद स्थितीत असल्याने बोलावणे आल्यानंतरही रक्तदान शिबिराला रक्तपेढीची चमू पोहचू शकत नाही. त्यामुळे रक्तपेढीला रक्त पिशव्यांचा पुरवठा कमी होऊ लागला आहे.
जास्तीत जास्त शिबिरस्थळी पोहचून जास्तीत जास्त रक्त गोळा व्हावे, या हेतूने राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने २०११ मध्ये मेडिकलच्या रक्तपेढीला एक अत्याधुनिक व्हॉल्व्हो बस दिली. १ कोटी ३२ लाख रुपये खर्चाच्या या बसमध्ये एकाचवेळी चार रक्तदात्यांचे रक्त घेण्याची सोय आहे. वातानुकूलित असलेल्या या बसमध्ये रक्तदात्याच्या मनोरंजनासाठी एलसीडीचीही व्यवस्था आहे. तसेच गोळा केलेले रक्त ठेवण्यासाठी फ्रिजसुद्धा आहे. ही बस मिळाल्यानंतर विविध सामाजिक संस्था व व्यक्तिंतर्फे रक्त गोळा करण्यासाठी या रक्तपेढीला बोलावणे येऊ लागले. जवळपास एक वर्षे ही बस शिबिरस्थळी धावू लागली. त्यामुळे मोठय़ा संख्येने रक्तपिशव्या गोळा होऊ लागल्यात. या बसच्या खर्चासाठी महाराष्ट्र राज्य एडस् नियंत्रण सोसायटीकडून सुरुवातीला काही दिवस नियमित अनुदान मिळू लागले. नंतर मात्र वेळेवर अनुदान मिळू शकत नसल्याने ही बस जागेवरच थांबू लागली. अनुदान मिळाले की पुन्हा ही बस धावायची. गेल्या काही दिवसांपासून धावणे आणि थांबणे हा प्रकार बसच्या नशीबी आला आहे. गेल्यावर्षी एकमुश्त अनुदान प्राप्तच झाले नाही. दहा ते पंधरा हजार रुपये अनुदान मिळायचे. यावर्षी तेही बंद झाले.
शिबिराच्या व्यतिरिक्त ही बस दर रविवारी फुटाळा तलावाशेजारी उभी राहायची. येथे पंधरा ते वीस रक्त पिशव्या सहज गोळा व्हायच्या. गेल्या पाच महिन्यांपासून अनुदान न मिळाल्याने ही बस जागेवरच थांबली आहे. त्यामुळे बोलावणे आल्यानंतरही रक्तपेढीची चमू शिबिरस्थळी पोहचण्यास असमर्थ ठरू लागली आहे. गेल्या पाच महिन्यात रक्तपेढीच्या चमूने रक्तदान शिबिर आयोजित करणाऱ्यांना स्पष्टपणे नकार दिल्याचे वृत्त आहे.
या कारणामुळे रक्तपेढीला मिळणाऱ्या रक्तापासून वंचित राहावे लागत आहे. अनुदान देणे होत नसेल तर ही बस दिलीच कशाला, असा संतप्त सवालही उपस्थित केला जात आहे. दरवर्षी डिझेल व देखभालीसाठी या बसला किमान तीन लाख रुपयांच्या अनुदानाची गरज आहे. चालू आर्थिक वर्षांत एक रुपयाही अनुदान मिळाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात मेडिकलमधील आदर्श रक्तपेढीचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय पराते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही बस सध्या जागेवरच उभी असल्याचे मान्य केले. परंतु कारण सांगण्यास त्यांनी स्पष्टपणे नकार दिला.
मेडिकलमध्ये दरवर्षी ३० हजार रक्त पिशव्यांची गरज असते. परंतु फक्त २० ते २२ हजारच रक्त पिशव्या गोळा होतात. अशा परिस्थितीत शिबिरातून गोळा होणाऱ्या हजारो रक्त पिशव्यांना मुकावे लागेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

केंद्र सरकारकडून अनुदान
मेडिकलमधील अत्याधुनिक बससाठी केंद्र सरकारने राज्य शासनाच्या राज्य रक्त संक्रमण परिषदेला अनुदान पाठवले आहे. त्यामुळे मेडिकलमधील ब्लड बँकेला ते मिळणे अपेक्षित होते. राज्य शासनाच्या राज्य रक्त संक्रमण परिषदेने अद्यापपर्यंत ते का पाठवले नाही, याची माहिती घेतो तसेच हे अनुदान त्वरित देण्यास सांगतो.
डॉ. सुनील खापर्डे
संचालक-राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद,
नवी दिल्ली.