ठाणे महापालिका मुख्यालयाजवळच असलेल्या पाचपाखाडी भागात दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याप्रकरणी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने त्या भागाची नुकतीच पाहणी केली. त्यामध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. चार ते पाच महिन्यांपूर्वी या भागात दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्यासंबंधी महापालिकेकडे तक्रारी आल्या होत्या. पण गेल्या आठवडाभरात अशा स्वरूपाची कोणतीही तक्रार आलेली नाही, अशी माहिती महापालिका पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता विनोद पवार यांनी दिली. दरम्यान अशा स्वरूपाचा पाणीपुरवठा होत असल्यास नागरिकांनी महापालिकेच्या निदर्शनास आणून द्यावे, असे आवाहनी त्यांनी केले आहे.
 पाचपाखाडी भागात गुरुकुल सोसायटी, नामदेव वाडी, उदयनगर, देवऋषीनगर, संत ज्ञानेश्वरनगर पथ, खळे कंपाऊड आणि सव्‍‌र्हिस रोड, असा परिसर येत असून त्या ठिकाणी मोठी लोकवस्ती आहे. या भागात दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचे वृत्त ‘वृत्तान्त’मध्ये प्रसिद्घ झाले होते. त्यानंतर या भागातील जलवाहिन्यांची तसेच होणाऱ्या पाण्याची पाहणी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केली.  पाहणीत स्वच्छ पाण्याचा पुरवठा होत असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या निदर्शनास आले, अशी माहिती विनोद पवार यांनी दिली.  चार ते पाच महिन्यांपूर्वी अशा स्वरूपाच्या तक्रारी आल्या होत्या. त्यावेळी त्या ठिकाणी कार्यवाही करण्यात आली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.