पर्सिनेट जाळ्याने मासेमारी करणाऱ्या कंरजा व मोरा बंदरातील हजारो बोटींच्या मालक आणि मजुरांमध्ये बोटींवर जाळे ओढण्यासाठी लावण्यात येणाऱ्या बूम या यंत्रणेच्या खर्चावरून वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे गेल्या १४ दिवसांपासून पर्सिनेटने मासेमारी करणाऱ्या शेकडो बोटी मोरा बंदरात उभ्याच आहेत. परिणांी मासळी आवक थांबल्याने मासळीच्या दरानेही उच्चांक गाठला आहे.करंजा व मोरा या उरण तालुक्यातील मासेमारी बंदरात ७५० पेक्षा अधिक मोठय़ा मासेमारी करणाऱ्या बोटी आहेत. या बोटींचे मालक (नाखवा) आणि प्रत्यक्ष मासेमारी करणारे खलाशी (मजूर) यांचे मासेमारीत समान वाटे आहेत. सध्या पर्सिनेट जाळ्याने खोल समुद्रात मासेमारी केली जाते. या मासेमारीच्या कालावधीत २० मजुरांची गरज लागते. जाळे ओढण्यासाठी तीन ते चार तासांचा वेळ त्यासाठी लागतो. यामध्ये जाळ्यांना बूम यंत्र बसविण्यात आले आहे. त्यासाठी ५ ते ७ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तो खर्च निम्मा निम्मा करून त्याचा हिस्सा मजुरांनीही द्यावा, अशी भूमिका मालकांनी घेतली आहे. मात्र मालकांच्या या भूमिकेला मच्छीमार मजुरांचा विरोध आहे. दोघांमधील मतभेदांमुळे मासेमारीवरील बंदी उठली असतानाही मासेमारी सुरू झालेली नाही. मोठय़ा संख्येने असलेल्या पर्सिनेट बोटींमुळे मच्छी विक्रेत्यांवर तसेच खवय्यांवरही परिणाम झाला आहे.