कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या (केडीएमटी) कल्याण-पनवेल बससेवेच्या वाहक-चालकांकडून कामाची वेळ संपण्याचे कारण पुढे करत प्रवाशांना पनवेलपर्यंत न नेता अध्र्या वाटेवर म्हणजे पेणधर फाटा येथे उतरवण्याचे प्रकार सध्या सुरू असून त्याचा प्रचंड त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे.
कल्याणहून पनवेलकडे तळोजा औद्योगिक वसाहतीच्या मार्गे जाणारी केडीएमटीची एकमेव बससेवा आहे. त्यामुळे या बससेवेला भरभरून प्रतिसाद प्रवाशांनी दिला. ही बससेवा किमान दहा मिनिटांनी असावी यासाठी तळोजा मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनने पाठपुरावा केला. परंतु, या पाठपुराव्याला फारसे यश लाभले नाही. एकीकडे दहा मिनिटांनी बस असावी या प्रवाशांच्या मागणीकडे केडीएमटीचे दुर्लक्ष होत असताना दुसरीकडे या बसच्या वाहक व चालकांचा मनमानीपणा तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये बस शिरल्यावर सायंकाळच्या वेळेस पाहायला मिळत असून प्रवासी या प्रकाराने त्रस्त झाले आहेत. बसेसच्या नामफलकावर कल्याण-पनवेल असे लिहिलेले असल्यामुळे पनवेलकडे जाणारे प्रवासी या बसेसमध्ये चढत असतात. परंतु ती बस पनवेल येथे न नेता पेणधर फाटा येथे थांबवून प्रवाशांना उतरण्यास भाग पाडले जाते व बस तेथून पुन्हा कल्याण डेपोत नेण्यात येते असे प्रकार नेहमी घडत आहेत. याबाबत वाहकाकडे विचारणा केली असता वाहकाकडून दमदाटीची उत्तरे प्रवाशांना ऐकावी लागतात.
रविवारी असाच प्रकार रात्रीच्या सुमारास एमएच ०५, आर. ११०७ क्रमांकाच्या बसबाबत घडला. कल्याणहून पनवेलला निघालेली ही बस रात्री ८ वाजता पेणधर फाटय़ापर्यंत आल्यानंतर थांबविण्यात आली आणि तेथे बसमधील प्रवाशांना उतरविण्यात आले. बस पेणधर फाटय़ापर्यंतच जाणार आहे याची सूचना बसमध्ये शिरल्यानंतर किंवा तिकीट देण्याअगोदर का नाही देण्यात आली असा जाब वाहक जयवंत डिगोळे यांना विचारला असता त्यांनी वाहक आणि चालकाच्या कामाची वेळ संपण्याचे आणि आम्हाला डेपोमध्ये वेळेत पोहोचणे गरजेचे असल्याचे कारण देत प्रवाशांना उतरवण्याचा प्रकार केला. असे प्रकार वारंवार होत असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात येते. या बसने जाणारे प्रवाशी हे प्रामुख्याने मजूर असल्याने ते वाहक-चालकांच्या उद्धटपणाला सामोरे जात नाही. सामोरे गेल्यास दमदाटी करून त्यांना हुसकावून लावण्यात येते, अशा या मजूर प्रवाशांच्या तक्रारी आहेत.
ही बस पनवेल डेपोत जाणार नसेल तर या बसच्या पाटीवर पेणधर फाटा थांबा असे लिहून का पाठवत नाही किंवा बसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तशा सूचना प्रवाशांना का देत नाही, असा संतापजनक सवालही प्रवाशांनी उपस्थित केला आहे.