जागतिकीकरणाने सर्वच क्षेत्रांत शिरकाव केला असून राजकीय, सामाजिक व आर्थिक प्रश्न बदलले. परंतु आजही कनिष्ठ दर्जाची कामे दलित-आदिवासींना करावी लागत असून, भारतातील जातीय उतरंड जागतिकीकरणानंतरही कायम आहे, असे प्रतिपादन श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्राच्या वतीने जागतिकीकरण व सामाजिक न्यायाचा प्रश्न या विषयावरील चर्चासत्रात डॉ. पाटणकर बोलत होते. मानव विकास मिशनचे अध्यक्ष कृष्णा भोगे यांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्घाटन झाले. मुंबई विद्यापीठातील समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. पी. जी. जोगदंड, केंद्राचे संचालक डॉ. बी. एस. वाघमारे उपस्थित होते. जागतिकीकरण हा प्रत्येकाच्या जीवनाशी भिडलेला विषय आहे. त्यामुळे जागतिकीकरणाला विरोध किंवा पाठिंबा देऊन हा विषय समजणार नाही, तर जागतिकीकरण कोणत्या प्रकारचे आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. ज्ञान माहिती व चळवळीचे जागतिकीकरण होत असेल तर त्यांचे स्वागत केलेच पाहिजे. परंतु भांडवलदारांच्या हातात अर्थव्यवस्थेची नाडी असणारेच श्रमिकांना कमी पैशात राबविणारे जागतिकीकरण आम्हाला नको आहे. जागतिकीकरण पूर्वीपासूनच होते. परंतु आताचे अत्याधुनिक साम्राज्यवादी जागतिकीकरण हे विषमता निर्माण करणारे आहे. आजही स्वच्छतेसारखी कनिष्ठ दर्जाची कामे दलित-मागासांनाच करावी लागत आहेत. त्यामुळे जागतिकीकरणाच्या प्रवाहात स्वातंत्र्य, समता व बंधुता या घटकांकडे नव्या दृष्टीने पाहणे गरजेचे आहे, असे डॉ. पाटणकर म्हणाले.
पैशामुळे वाढले सामाजिक प्रदूषण- भोगे
जागतिकीकरणामुळे पैसा हाच अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला असून, समाजातील नीतिमत्ता लोप पावत आहे. चुकीच्या मार्गाने, हव्यासापोटी कमवलेला पैसा सामाजिक प्रदूषण वाढवतो, असे कृष्णा भोगे म्हणाले. पैशासाठी नीतिमत्ता विकणारे लोक सामाजिक न्याय मागू शकत नाहीत. जागतिकीकरणामुळे भांडवल वाढले, देशाचा विकास निर्देशांक वाढला म्हणजे माणूस सुखी झाला, असे नाही. मानव विकास निर्देशांकासोबत भारताने भूतानप्रमाणे मानव आनंद निर्देशांक काढण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले. डॉ. वाघमारे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन हणमंत सोनकांबळे यांनी केले.