केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या(सीबीएसई) बारावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात घोषित होणार असल्याचे संकेत सीबीएसईने दिले आहेत. सीबीएसईच्या दहावी व बारावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना एप्रिल महिना संपता संपता निकालाचे वेध लागतात. साधारणत: मेच्या शेवटच्या आठवडय़ात सीबीएसई बारावीचा निकाल घोषित केला जातो. गेल्यावर्षी २८ मे रोजी बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला होता. यंदाही मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात निकाल घोषित होणार आहेत.
एकूण आठ प्रादेशिक विभागांमध्ये सीबीएसईने विभागणी केली आहे. त्यामध्ये दिल्ली, चेन्नई, गुवाहाटी, अजमेर, पंचकुला, अलाहाबाद, पाटणा, भुवनेश्वर या प्रादेशिक विभागांचा समावेश होतो. या आठही प्रादेशिक विभागांचा निकाल एकाच दिवशी जाहीर होत नाही. साधारणत: बारावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात जाहीर व्हायला सुरुवात होते. आठही विभागांचे निकाल जूनच्या शेवटच्या आठवडय़ात पूर्णपणे जाहीर होतात. चेन्नई प्रादेशिक विभाग सर्वात मोठा आहे. महाराष्ट्रातील सर्व सीबीएसई शाळांचे निकाल चेन्नई विभागातून लागतात. एकूण २१ देशांमध्ये सीबीएसईच्या १४१ संलग्नित शाळा आहेत. सर्व केंद्रीय विद्यालये आणि जवाहर नवोदय विद्यालये सीबीएसईला संलग्नित आहेत. त्यांचे निकालही सीबीएसईच्या बरोबरच लागतात.
सीबीएसईचा दहावीच निकाल गेल्यावर्षी २० मे पासून जाहीर व्हायला सुरुवात झाली होती. जूनच्या पहिल्या आठवडय़ात सर्व प्रादेशिक विभागातील निकाल घोषित झाले होते. गेल्यावर्षी चेन्नई विभागाचा दहावीचा निकाल २१ मे रोजी जाहीर करण्यात आला होता. यावर्षीही तेच वेळापत्रक पाळले जाईल, अशी अपेक्षा आहे.