News Flash

नव्या इमारतींना सीसीटीव्ही अनिवार्य!

ठाणे येथील समतानगर भागातील सुंदरवनपार्कमधील इमारत आग दुर्घटनेच्या पाश्र्वभूमीवर शहरात नव्याने उभ्या राहणाऱ्या सर्वच इमारतींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे

| March 28, 2014 06:58 am

नव्या इमारतींना सीसीटीव्ही अनिवार्य!

ठाणे येथील समतानगर भागातील सुंदरवनपार्कमधील इमारत आग दुर्घटनेच्या पाश्र्वभूमीवर शहरात नव्याने उभ्या राहणाऱ्या सर्वच इमारतींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची सक्ती विकासकांना करण्याचा विचार महापालिका स्तरावर सुरू झाला असून या निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या इमारतींना अग्निशमन दलाचा दाखला देण्यात येणार नाही. तसेच जुन्या इमारतींमध्येही सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, यासाठी मोहीम राबविण्याचा महापालिकेचा बेत आहे. इमारतीमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची जोडणी अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात करण्यात येणार आहे. त्याआधारे इमारतींमधील अग्निसुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही दुरुस्ती आढळल्यास त्यांना तातडीने नोटिसा धाडण्याची योजना विचाराधीन आहे.
गेल्या आठवडय़ात समतानगर येथील सुंदरवनपार्कमधील गुलमोहर इमारतीच्या दहाव्या मजल्यावर आग लागली होती. त्यामध्ये दोन वृद्घांना आपले प्राण गमावावे लागले, तर आगीत घराचे मोठे नुकसान झाले होते. या घटनेदरम्यान या इमारतीमधील अग्निशमन यंत्रणेत बिघाड असल्याचे उघड झाले होते. त्यामुळे या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाला तातडीने पर्यायी व्यवस्था उभी करावी लागली. त्यात त्यांचा बराच वेळ खर्ची गेला होता. याच पाश्र्वभूमीवर इमारतींमधील अग्निसुरक्षा व्यवस्थेवर नजर ठेवण्यासाठी अग्निशमन दलाने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा प्रस्ताव समोर आणला आहे. या प्रस्तावानुसार, इमारतींमधील अग्निशमन यंत्रणा, जिने आणि मोकळ्या (रिफ्यूजी) परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि त्याची मुख्य जोडणी अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात असणार आहे. या नियंत्रण कक्षातून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे इमारतींमधील या यंत्रणेवर नजर ठेवण्यात येणार असून त्यामध्ये काही अडथळे अथवा तांत्रिक अडचणी आढळल्यास संबंधित इमारतींना नोटिसा पाठविण्यात येणार आहेत. या नोटिशीद्वारे इमारतीधारकांना दुरुस्ती तसेच उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.
..अन्यथा अग्निशमन दलाचा दाखला नाही
ठाणे शहरात उभ्या राहणाऱ्या नवीन गृहसंकुलातील प्रत्येक इमारतीमधील अग्निसुरक्षा यंत्रणेवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत आणि त्याची जोडणी अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षात करण्यात यावी. तसेच याची अंमलबजावणी ज्या इमारतीमध्ये करण्यात येणार नाही, त्या इमारतींना अग्निशमन दलाचा दाखला मिळणार नाही, असे प्रयोजन महापालिका स्तरावर करण्यात येत आहे. तसेच जुन्या इमारतींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी मोहीम राबवून आवाहन करण्याचा विचारही महापालिका करीत आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2014 6:58 am

Web Title: cctv is compulsory for new buildings
टॅग : Cctv,Thane
Next Stories
1 ‘आरटीओ’च्या जाचक नियमांमुळे पर्यटन व्यवसाय अडचणीत
2 प्रदूषण न आढळल्याने बंद कापड उद्योग पुन्हा सुरू
3 गृहकर्जाच्या तीनशे ‘भाग्यलक्ष्मी’
Just Now!
X