सोलापुरात उभारण्यात आलेल्या व राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते लोकार्पण होऊ घातलेल्या डॉ. निर्मलकुमार फडकुले नाटय़संकुलाचा वाद अद्याप सुरूच आहे. राजकीय ताकदीचा वापर करून कायदा पूर्णत: वाकवून आणि प्रशासनाला झुकवून या नाटय़संकुलाची उभारणी करण्यात आल्याचा आक्षेप अरविंद केजरीवालप्रणीत आम आदमी पार्टीने घेतला आहे. हे आक्षेप डॉ. फडकुले प्रतिष्ठानने फेटाळले असले तरी या वादग्रस्त मुद्दय़ावर ‘आमने-सामने’  खुली चर्चा करण्याचे आव्हान आम आदमी पार्टीने डॉ. फडकुले प्रतिष्ठानला दिले आहे.
यासंदर्भात आम आदमी पार्टीचे संस्थापक-सदस्य तथा माहिती अधिकार कायदा मंचचे प्रमुख विद्याधर दोशी व चंदूभाई  देढिया यांनी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षांना पत्र पाठवून दोन्ही पक्षकारांची ‘आमने-सामने’ खुली चर्चा घडवून आणण्याचे आवाहन केले आहे. या खुल्या चर्चेत डॉ. फडकुले प्रतिष्ठानचे विश्वस्त व आम आदमी पार्टीचे प्रतिनिधी मंडळ, महापालिकेचे नगर अभियंता सुभाष सावसकर, पालिकेचे तत्कालीन भूमी व मालमत्ता अधीक्षक सच्चिदानंद व्हटकर, नगररचना विभागाचे सहायक संचालक, बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी आदींना सहभागी करून घ्यावे. तसेच जिल्हाधिकारी गोकुळ मवारे, निवासी उपजिल्हाधिकारी पराग सोमण, नगरभूमापन अधिकारी, दुय्यम निबंधक (सोलापूर उत्तर-२), धर्मादाय आयुक्त कार्यालयातील संबंधित अधिकारी, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी, पालिका सभागृहनेते महेश कोठे व पालिका स्थायी समितीचे तत्कालीन सभापती आणि अन्य संबंधितांनाही या आमने-सामने खुल्या चर्चासत्रात सहभागी करून घ्यावे, अशी सूचना आम आदमी पार्टीने केली आहे.
डॉ. फडकुले नाटय़संकुलाच्या उभारणीबद्दल आम आदमी पार्टीने घेतलेले आक्षेप खोडून काढताना डॉ. फडकुले प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी पत्रकार परिषदेत नथीतून तीर मारण्याचा प्रयत्न केल्याचे विद्याधर दोशी यांचे म्हणणे आहे. माहिती अधिकाराचा दुरुपयोग केला जात असून पुरातत्त्व विभागाकडे स्वत:चे प्रकरण मान्य होत नाही, त्याचा राग दोशी हे काढत आहेत, असे फुटाणे यांनी म्हटले होते. त्याबाबतची सत्यता पडताळण्यासाठी आमने-सामने येण्याचे आव्हान विद्याधर दोशी यांनी दिले आहे.
डॉ. फडकुले प्रतिष्ठानच्या लोकार्पण सोहळ्यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे येत्या २९ डिसेंबर रोजी सोलापुरात येत आहेत. त्याची जंगी तयारी एकीकडे सुरू असताना दुसरीकडे अखेपर्यंत डॉ. फडकुले नाटय़संकुलाच्या उभारणीचा वाद पेटता ठेवण्यात येत असल्यामुळे नागरिकात हा चर्चेचा विषय ठरला आहे.