एकामागून एक नावीन्यांनी, प्रयोगशीलतेने, सर्जनतेने नटलेल्या सात एकाकिकांची प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला लज्जतदार मेजवानी मिळत होती.. प्रत्येक एकाकिकांमधून गाठीशी अद्भुत अनुभव गोळा होत असल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली होती.. साऱ्या नीटनेटक्या एकाकिकांमुळे नेमकी सवाई कोण ठरणार, याचा अंदाज बांधता येत नव्हता.. परीक्षकांनीही त्यासाठी थोडा जास्तीचा वेळ घेतला.. निकाल जाहीर होण्यापूर्वी रवींद्र नाटय़ मंदिर नादमय झालं होतं.. प्रत्येक कोपऱ्यातून बॅण्डचे सूर येत होते.. एकांकिका करताना एकमेकांना पाण्यात पाहणारे स्पर्धक रंगभूमीवरची ईष्र्या सोडून आता एकमेकांना ‘चीअर अप’ करू लागले होते.. एकांकिकांचे निकाल जाहीर होण्यापूर्वी एकच शांतता पसरली होती.. ‘उळागट्टी’, ‘चॉकलेटचा बंगला’, ‘बेल’, ‘क’ ला काना ‘का’? बाजी मारतील असं वाटत होतं.. प्रेक्षक पसंतीचा पहिला पुरस्कार आणि त्यानंतर सलग तीन पुरस्कार उळागट्टीने पटकावले तेव्हा ही एकांकिका बाजी मारणार, अशी शक्यता वर्तवली जाऊ लागली तरी त्यांना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आणि आता पहिली कोणती? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले.. श्वास रोखले गेले. परीक्षक सुनील बर्वे नाव जाहीर करण्यासाठी मंचावर आला तेव्हा नाटय़गृहातून वेगवेगळ्या एकांकिकांची नावे येत होती.. हा क्षण काहीसा ताणून धरत, टेन्शन वाढवत सुनीलने ‘क’ ला काना ‘का’? सवाई ठरल्याचे जाहीर केले आणि साऱ्यांनीच उत्स्फूर्त टाळ्यांचा कडकडाट केला. ‘क’ ला काना ‘का’? मधील पूर्वा वनपाळ आणि चॉकलेटचा बंगलामधील अजिंक्य गोखले यांनी अनुक्रमे सवरेत्कृष्ट अभिनेत्री आणि अभिनेत्याचे पुरस्कार पटकावले.
‘चतुरंग प्रतिष्ठान’ आयोजित सवाई एकांकिकेमध्ये या वेळी नवनवीन विषय, दर्जेदार सादरीकरण पाहायला मिळाले खरे, पण परीक्षकांच्या मते फार कमी एकांकिका एक चांगले ‘प्रोडक्ट’म्हणून सादर झाल्या. डॉ. टी.के. रात्र महाविद्यालयाची ‘लाडी’ रंगलीच नाही, पण सर परशुराम महाविद्यालयाची ‘बेल’ मात्र चांगलीच वाजली.
गतिमंद मुलाची व्यथा मांडणारी गरवारे वाणिज्य महाविद्यालयाची ‘चॉकलेटचा बंगला’ गोड झाली. ओम साई कलामंचाची ‘फ्लॉवरपॉट’ गुलदस्त्यातील गोष्टी मांडण्यात थोडीशी कमी ठरली. भारती विद्यापीठाची ‘उळागट्टी’ पुराने वेढलेल्या एका झाडावर सादर करण्याचा सर्जनशील प्रयत्न आणि त्याला मिळालेली अभिनयाची व तांत्रिक साथ अप्रतिम होती.
कीर्ती महाविद्यालयाची ‘नहीं तो गोली मार दँुगा’ मनोरंजक ठरली नाही, किंबहुना प्रभावहीन ठरली. एम.आय.टी.ची ‘क’ ला काना ‘का’? सत्य पूर्ण माहिती नसतानाही शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर होत असल्याचा प्रश्न, व्यथा मांडणारी होती.
निकाल
एकांकिका प्रथम : ‘क’ ला काना ‘का’? (एम.आय.टी., पुणे).
एकांकिका द्वितीय : उळागट्टी (भारती विद्यापीठ, पुणे).
प्रेक्षक पसंती : उळागट्टी (भारती विद्यापीठ, पुणे).
सर्वोत्तम लेखक : अभयसिंह जाधव ( ‘क’ ला काना ‘का’?).
सर्वोत्तम दिग्दर्शक : क्षितिज दाते (बेल).
सर्वोत्तम अभिनेता : अजिंक्य गोखले (चॉकलेटचा बंगला).
सर्वोत्तम अभिनेत्री : पूर्वा वनपाळ ( ‘क’ ला काना ‘का’?).
सर्वोत्तम प्रकाशयोजना : हेमंत चातुर्य, शुभंकर सौंदणकर (उळागट्टी).
सर्वोत्तम ध्वनिसंयोजक : आकाश चौधरी (उळागट्टी).
सर्वोत्तम नेपथ्य : अमेय भालेराव, प्रसाद राजोपाध्ये (उळागट्टी).