डोंबिवलीतील मानपाडा येथील शनी मंदिरासमोरील सर्वोदय सोसायटीत गेल्या काही महिन्यांपासून रसायनमिश्रित पाण्याचा पुरवठा होत आहे. रात्रीच्या वेळेत उग्र वायू काही कंपन्यांमधून सोडण्यात येत आहे. त्यामुळे या भागातील रहिवासी विविध आजारांनी त्रस्त आहेत.
या भागातील सुमारे दीडशे ते दोनशे रहिवाशांनी याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन हे गैरप्रकार करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. खासदार आनंद परांजपे यांचीही भेट घेऊन त्यांना हे प्रदूषण रोखण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी करण्यात येणार आहे, असे रहिवाशांनी सांगितले. हवेतील आणि जलप्रदूषणामुळे घरातील लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, वृद्ध यांना सर्वाधिक त्रास होत आहे. या भागातील गटारे फुटलेली आहेत. या गटारांमधून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये रसायनमिश्रित पाणी घुसते. हेच पाणी घराघरामध्ये जाते. काही कंपन्या गटारामधून रसायनमिश्रित पाणी सोडत आहेत. त्यामुळे रस्त्याने चालताना उग्र रसायनाचा दर्प पसरलेला असतो. या सततच्या प्रदूषणामुळे काही रहिवासी या भागातील घरे विकून अन्यत्र जाण्याचा विचार करू लागले आहेत, असेही रहिवाशांनी सांगितले