उरण नगरपालिकेच्या शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एकमेव सानेगुरुजी बालोद्यानाची दुरवस्था झाली आहे. लहान मुलांना येथे खेळण्यासाठी असलेले साहित्य तुटलेल्या अवस्थेत पडून असून येणाऱ्या सुट्टीत उरणमधील बालकांना खेळापासून वंचित राहावे लागणार आहे.
३० हजाराच्या आसपास लोकसंख्या असलेल्या उरण नगरपालिकेच्या हद्दीत मोजून तीन बालोद्याने आहेत. त्यापैकी उरण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या विमला तलाव येथे सानेगुरुजी बालोद्यान आहे. या बालोद्यानातील खेळणी गेली अनेक वर्षे बदलली गेलेली नाहीत. येथील फायबरच्या घसरगुंडय़ा अनेक ठिकाणी तुटल्याने खेळताना मुलाला अपघात होण्याची शक्यता आहे. येथील पाळण्यांच्या साखळ्याही गंजल्यामुळे त्या वापराविनाच पडून आहेत. उरण शहरातील मुलांच्या संख्येच्या तुलनेत सानेगुरुजी बालोद्यानात असलेली खेळणी कमी आहेत. त्यामुळे सुट्टीच्या दिवसात तरी शहरातील मुलांना खेळण्यासाठी बालोद्यानात खेळणी उपलब्ध करण्यात यावी अशी मागणी उरणमधील नागरिकांकडून केली जात आहे.
या संदर्भात उरण नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनोद डवले यांच्याशी संपर्क साधला असता येत्या काही दिवसातच नवीन व अत्याधुनिक खेळणी बालोद्यानासाठी आणली जातील, तसेच सुट्टीपूर्वी ती उरणमधील बालोद्यानात लावली जातील असे आश्वासन दिले आहे.