दिवाळीच्या खरेदीने बाजारपेठा गर्दीने फुलल्या आहेत. बाजारात दाखल झालेल्या चायनामेड वस्तूंनी बाजारपेठ काबीज केली आहे. आकर्षक आणि किमतीने कमी असलेल्या या वस्तूंना ग्राहकांकडूनसुद्धा अधिक पसंती मिळत आहे. यात आकाशकंदील, विद्युत रोषणाईसाठी तोरणे, फटाके, पणत्या आणि भेटवस्तूंचा समावेश आहे.
मातीपासून तयार केलेल्या दिव्यांपेक्षा चायनामेड पणत्या घेण्याकडे महिलांचा अधिक कल दिसत आहे. या पणत्यांमध्ये मेण असल्याने त्यात सारखे तेल ओतण्याची गरज नसून यातील मेण सुवासिक असल्याने अधिक पसंतीस उतरत आहे. याचप्रमाणे विद्युत रोषणाईसाठी वापरण्यात येणारे पारंपरिक तोरणे (लाईटिंग) याच्या ऐवजी चायनामेड तोरण खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. ही तोरणे वजनाने हलकी आणि आर्कषक असून त्यांची किंमतदेखील आवाक्यात असल्याने खरेदीकडे ग्राहकांचा ओढा वाढत आहे. यातच लक्ष्मी, गणपती आदी देवतांची चित्रे असलेली चायनामेड आकाशकंदिले ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. ५० रुपयांपासून ते १५०० रुपयांपर्यंत या कंदिलांच्या किमती आहेत. या कंदिलांमधील रंगसंगती अधिक आर्कषक असून आकारदेखील सुबक आहेत. हे कंदील घडी (फोिल्डंग) घालून ठेवता येत असल्याने पुढील दिवाळीत ते वापरणे शक्य आहेत. तसेच त्यांच्या किमती कमी असल्याने पुढील दिवाळीत नवीन कंदील घेण्याकडे ग्राहकांचा अधिक कल असल्याने या कंदिलांची दरवर्षी मागणी वाढत आहे.
फुलपाखरांच्या आकारातील कंदील, लाइटचे झुंबर, पणती, लाइटचे चक्र, फुलमाळातील दारावरचे तोरण, असे विविध चायनामेड लाइटिंगच्या वस्तूंची ग्राहक खरेदी करताना दिसत आहेत. यंदाच्या दिवाळीच्या निमित्ताने बाजारापेठेत आलेल्या या वस्तू काहीशा स्वस्त असल्या तरी दीर्घकाळ टिकणाऱ्या असल्याने ग्राहकांनी यालाच पंसती दिली आहे. त्याचप्रमाणे दिवाळीतील अविभाज्य भाग असलेली फटाक्यांची बाजारपेठदेखील चायना फटाक्यांनी काबीज केली आहे. यात पाऊस, भुईचक्र, फुलबाजा, लड, रॉकेट, सुतळी बार आदी चायना फटाके बाजारात असून त्यांच्या किमती कमी असल्याने खरेदीसाठी गर्दी होत आहे.