राज्यात भ्रष्टाचाराबाबत आघाडीवर असलेल्या सिडको महामंडळातील भ्रष्टाचाराची ही कीड समूळ नष्ट करण्याच्या दृष्टीने सिडको प्रशासनाने एक महिन्यापूर्वी तयार केलेल्या स्वतंत्र वेबलिंककडे तक्रारदारांनी सपशेल पाठ फिरवली असून या वेबलिंकवर केवळ तीन तक्रारी दाखल झाल्या असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे या तीनही तक्रारीत दम नसल्याने त्या तात्काळ निकालात काढण्यात आल्या असून दोन तक्रारी तर भ्रष्टाचाराच्या नसून समस्यांचा पाढा वाचणाऱ्या आहेत.
सिडको म्हणजे जमीन आणि जमीन म्हणजे घोटाळा, भ्रष्टाचार असे एक समीकरण मागील काही वर्षांत तयार झालेले आहे. त्यामुळे सिडकोतील भ्रष्टाचाराची प्रकरणे प्रसारमाध्यमांपासून ते विधानसभेपर्यंत वेशीवर टांगली गेलेली आहेत. त्यामुळे भ्रष्टाचारी महामंडळ अशीच काहीशी ओळख सिडकोची निर्माण झालेली आहे. त्याला दोन वर्षांपासून बराचसा आळा बसला आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी सिडकोची ही ओळख पुसण्याचा सर्वप्रथम प्रयत्न केला असून त्यासाठी पारदर्शक कारभाराचा वस्तुनिष्ठ पाठ कर्मचाऱ्यासमोर ठेवला आहे. भ्रष्टाचाराची पाळेमुळे सिडकोत खोलवर रुजल्यामुळे ती नष्ट करण्यासाठी वीस कलमी कार्यक्रमाची आखणी करण्यात आली असून, गेली दोन वर्षे त्यानुसार उपाययोजना केल्या जात आहेत. यात सिडकोच्या वेबसाइटवर सर्व माहिती खुली करणे, दक्षता विभाग, अभियंता विभागात तिसऱ्या संस्थेकडून चाचपणी, साडेबारा टक्के वितरण विभागातील केऑस, नागरी सुविधा केंद्र, ई पेमेंट, उच्च दर्जाची निविदा समिती, नयना क्षेत्रातील भूखंड वितरणाचा खुला कारभार, लाचलुचपत विभागाबरोबर समन्वय, ऑनलाइन अर्ज स्वीकार आणि दक्षता वेबसाइट अशा उपाययोजनांचा समावेश आहे. त्यामुळे सिडकोतील भ्रष्टाचाराला आळा बसला आहे, पण याचा अर्थ तो समूळ नष्ट झालेला आहे असा नाही. त्यामुळेच इतकी उपाययोजना करूनही लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात दोन कर्मचारी सापडले आहेत. सिडकोतील हा भ्रष्टाचार आणखी उघडकीस यावा यासाठी सिडकोने १५ जानेवारी रोजी डब्लू डब्लू डब्लू महाराष्ट्र. गव्‍‌र्ह्. इन या वेबसाइटवर दक्षता विभागाचे स्वतंत्र असे वेबलिंक पेज सुरू केले आहे. त्यावर आतापर्यंत केवळ तीन तक्रारी आलेल्या असून यात खारघर येथे चिकन-मटण दुकान सुरू करण्यात आले आहे. पनवेल येथील एका शाळेत मुलांना मैदान उपलब्ध करून दिले जात नाही. अशा समस्यांच्या तक्रारी आहेत. यात नासिक कार्यालयातील एक तक्रार भ्रष्टाचारविषयी आहे, पण ती सिडको कार्यालयातील कर्मचाऱ्याविषयी नसल्याचे तसे तक्रारदाराला कळविण्यात आले आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराचा गाजावाजा करणाऱ्या सिडकोतील भ्रष्टाचाराविषयी पुराव्यानिशी तक्रार करण्यास तक्रारदार पुढे आले नसल्याचे दिसून आले आहे.
सिडकोच्या वेबसाइटवर तीनपेक्षा जास्त तक्रारी नाहीत याचा अर्थ सिडकोविषयी तक्रारी कमी झालेल्या आहेत असा होता, पण आम्हाला जनतेने जास्तीत जास्त तक्रारी कराव्यात, अशी अपेक्षा आहे. त्यासाठीच ही वेबलिंक तयार करण्यात आली आहे. भ्रष्टाचाराच्या तक्रारीविषयी तात्काळ दखल घेतली जाईल याची हमी आम्ही देत आहोत. नाशिक येथील तक्रार ही भ्रष्टाचाराची होती, पण ती सिडको कर्मचाऱ्याविषयी नसल्याचे स्पष्ट झाले. सिडको भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी जनतेने सहभाग घ्यावा, अशी विनंती आहे. केवळ भ्रष्टाचाराच्या नावाने ओरडून चालणार नाही, तो साफ करण्यासाठी सर्वानी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे.
डॉ. प्रज्ञा सरवदे, मुख्य दक्षता अधिकारी सिडकों