झपाटय़ाने विकसित होणाऱ्या रायगड जिल्ह्य़ातील महामुंबई क्षेत्रात विविध प्रकारची गुंतवणूक वाढावी यासाठी आता सिडको प्रशासन पुढे सरसावले आहे. शुक्रवारी मुंबईत होणाऱ्या ट्रान्सफार्मिग मुंबई या कार्यक्रमात सिडको विमानतळ, मेट्रो आणि नयना क्षेत्राचे सादरीकरण करणार आहे. शहर वसविण्याची जबाबदारी घेतलेल्या सिडकोने यापूर्वी उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी म्हणावे असे प्रयत्न केले नव्हते. त्यामुळे नवी मुंबई, महामुंबईचे महत्त्व पटवून देण्यासाठी सिडको आपले खास प्रकल्प या कार्यक्रमात सादर करणार आहे.
मुंबई फर्स्ट या संस्थेने आयोजित केलेल्या एमएमआरडीए क्षेत्राचा एकत्रित विकास या कार्यक्रमाला शुक्रवारी मुंबईत अंबानीपासून अमिताभ बच्चनपर्यंतचे सर्व दिग्गज हजेरी लावणार आहेत. देशातील गुंतवणूक वाढावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक परदेशांची वारी करीत आहेत तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच जागतिक व्यापारी परिषदेत (दाव्होस) राज्यात उद्योजकांना मोठी संधी असल्याचे परदेशी उद्योजकांना पटवून दिले आहे. सिडकोची स्थापना करताना गृहनिर्मिती, सेवासुविधा, यांच्याबरोबरच उद्योग उभारणी करण्यास सिडकोने प्रयत्न करावेत असे अभिप्रेत होते, पण सिडकोने शहरांचे शिल्पकार होताना या क्षेत्राला फार महत्त्व दिल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे नवी मुंबईत सिडकोच्या माध्यमातून लघु किंवा मध्यम उद्योगांची उभारणी झाल्याचे ठळकपणे दिसून येत नाही. टीटीसी एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रात असणाऱ्या शेकडो उद्योगांनी नवी मुंबईला रामराम ठोकला आहे.
तळोजा, कळंबोली परिसरात व्हिडीओकॉनला एलसीडी प्रकल्पासाठी दिलेली २५० एकर जमीन कंपनीने हा प्रकल्प विविध कालावधीत सुरू न केल्याने नुकतीच परत घेण्यात आली आहे. उरण परिसरात एसईझेडच्या नावाखाली रिलायन्सने घेतलेल्या    जमिनीचा अद्याप वापर झालेला नाही. त्यामुळे सिडकोच्या माध्यमातून शहरात प्रदूषणविरहित मोठे उद्योग येऊ शकलेले नाहीत. येत्या काळात रायगड जिल्ह्य़ातील २७० गावाजवळील ६० हजार हेक्टर जमिनीचा विकास आराखडा सिडको तयार करीत आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या माध्यमातून अनेक उद्योगांची निर्मिती होणे शक्य आहे. या क्षेत्रातील जमीन संपादित करता येत नसली तरी सिडको अनेक सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहे. पुढील चार वर्षांत देशातील महत्त्वाकांक्षी विमानतळ प्रकल्प याच क्षेत्रात उभा राहत आहे. मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील काम प्रगतिपथावर आहे. बेलापूर ते पेंदार या ११ किलोमीटर क्षेत्रात विमानतळापूर्वी मेट्रोचा खडखडाट ऐकू येणार आहे. नवी मुंबईतील या बडय़ा प्रकल्पाविषयी मुंबईकरांना फारशी माहिती नाही. त्यांना आकर्षित करण्यासाठी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया हे शुक्रवारी या तीन महत्त्वाच्या प्रकल्पांचे सादरीकरण बडय़ा असामींसमोर करणार आहेत.