सिडकोच्या वतीने खारघर तळोजा परिसरात बांधण्यात येणाऱ्या १२००० घरांपैकी सेक्टर ३६ येथे पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या मध्यमवर्गीयांच्या १२२४ घरांच्या दराबाबात सिडको प्रशासन अद्याप तळ्यात-मळ्यात आहे. या घरांच्या काही रचनेत बदल करण्यात आल्याने तसेच दर ठरविण्यास विलंब होत असल्याने या घरांचे दर वाढण्याची शक्यता आहे. सध्या असलेल्या आर्थिक मंदीच्या काळात या घरांचा दर जास्त ठेवल्यास त्यास किती प्रतिसाद मिळेल याबाबत सिडको अधिकारी साशंक आहेत.
महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रात असलेली घरांची मागणी लक्षात घेऊन सिडकोने सध्या खारघर, तळोजा परिसरात बारा हजार घरे बांधण्याचा संकल्प सोडला आहे. यातील एक हजार २२४ घरांच्या बांधकामाने वेग घेतला असून ती येत्या सहा महिन्यात पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे. ही सर्व घरे मध्यम व उच्च उत्पन्न गटातील लोकांसाठी आहेत. या घरांजवळच अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी ३५०० घरे बांधण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. यातील मध्यम व उच्च उत्पन्न गटातील नागरिकांची घरे बांधून लवकर तयार होणार असल्याने त्यांचा दर निश्चित करणे आवश्यक आहे. हा दर ठरविण्याचे काम सिडकोचा अर्थतज्ज्ञ विभाग करीत आहे. परंतु गेले सहा माहिने या घरांच्या दराबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
या संकुलात सिडकोने एखाद्या बडय़ा बिल्डरला लाजवेल अशा सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. यात स्विमिंग पुलापासून क्लब हाऊसपर्यंतच सर्व सुविधा आहेत. त्यासाठी सॅम्पल फ्लॅटदेखील तयार करण्यात आला आहे. सिडकोचे माजी व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे यांची ही संकल्पना आहे. सिडकोने ती पहिल्यांदाच राबविली असून त्याला चांगला प्रतिसाद आहे. या घरांचे लवकर दर ठरविण्यात यावेत अशी मागणी केली जात आहे, पण सिडको त्याबाबत तळ्यात-मळ्यात आहे. या परिसरात पाच ते सहा हजार रुपये प्रतिचौरस फूट दर खासगी बिल्डरांचा आहे.  खासगी बिल्डरांपेक्षा सिडकोचा दर कमी असावा अशी नागरिकांची अपेक्षा आहे. त्यात इमारत रचनेत काही बदल होत असल्याने दर वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या आर्थिक मंदीचे वारे घोंगावत आहेत. त्यामुळे खासगी बिल्डरदेखील कमी दरात घरे विकू लागले आहेत. सिडकोने त्यांच्यापेक्षा जास्त दर आकारल्यास त्याला किती प्रतिसाद मिळेल याबाबत सिडको अधिकारी साशंक आहेत. सिडकोच्या छोटय़ा घरांवर उडय़ा पडतात हा पूर्वानुभव आहे, तरीही या घरांच्या दराबाबत सिडको ठाम भूमिका घेऊ शकलेली नाही. दर ठरविण्यात जसा विलंब होईल, तसे सिडकोचे दर वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.