भ्रष्टाचारी महामंडळ म्हणून असलेली सिडकोची ओळख पुसण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून गुरुवारी भ्रष्टाचाराच्या तक्रारी ऐकून त्यांचे निवारण करण्यासाठी महामंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर स्वतंत्र अशा वेबलिंकची निर्मिती करण्यात आली आहे. भ्रष्टाचारमुक्त प्रशासनच चांगला नगरविकास घडवू शकते या विचारावर आधारलेल्या या वेबलिंकचे उद्घाटन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामुळे मकर संक्रातीच्या मुहूर्तावर सिडकोने भ्रष्टाचाराच्या विरोधात एक प्रकारे उत्तरायणाला सुरुवात केली आहे. या वेळी राज्याचे माजी मुख्य सचिव जयंत बाठिया उपस्थित होते.
राज्यातील प्रमुख महामंडळापैकी एक असलेल्या सिडकोतील भ्रष्टाचार सर्वश्रुत आहे. साडेबारा टक्के योजनेतील भूखंड वितरण विभाग हे या भ्रष्टाचाराचे एक मुख्य कारण मानले जाते. भाटिया यांनी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालक पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम या प्रशासनाचा पारदर्शक कारभार करण्याची हमी दिली. त्यासाठी २० कलमी कार्यक्रम राबविल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सिडकोतील भूखंड घोटाळ्यांवर प्रकाश टाकण्यासाठी मे २०१३ रोजी स्वतंत्र दक्षता विभाग स्थापन करण्यात आला असून त्याच विभागाच्या वतीने महामंडळाच्या साइटवर दक्षता नावाच्या वेबलिंकची निर्मिती करण्यात आली आहे. सिडकोमध्ये भ्रष्टाचाराला थारा दिला जाणार नाही याची हमी देताना भाटिया यांनी या वर्षी सिडकोच्या कामांचे रिझल्ट दिले जातील, अशी ग्वाही दिली. या वेबलिंकवर कोणत्याही अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार केली जाऊ शकणार असून तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवले जाणार आहे. सिडकोच्या दक्षता विभागाकडे अलीकडे एकूण ७९ प्रकरणांचा तपास सुरू असून या विभागाने साडेबारा टक्के वितरण विभागातील केलेल्या सखोल चौकशीमुळे सिडकोची करोडो रुपयांची जमीन वाचविण्यात आली आहे. इतक्या उपाययोजना करूनही सिडकोत भ्रष्टाचार प्रकरणात अटक केलेल्या घटना घडल्या आहेत. त्यासाठी लाचलुचपत विभागाला सिडको प्रशासनाने मदत केल्याची माहिती या वेळी भाटिया यांनी दिली. सिडकोचा हा प्रयोग यानंतर संपूर्ण देशात राबविला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वेबलिंकमुळे सिडकोत पैसे मागणाऱ्या कोणत्याही कर्मचारी व अधिकाऱ्यांची तक्रार आता घरबसल्या करता येण्यासारखी आहे.

भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या नादात सिडकोचा कारभार अलीकडे थंड चालला असून एखादी फाइल मंजूर होण्यासाठी वेळ लागत आहे याचा अर्थ त्यावर काहीतरी वजन ठेवले पाहिजे, असा एक मतप्रवाह तयार होत आहे. त्यामुळे भ्रष्टाचारमुक्त सिडको तयार करताना ती वेगवान करण्याची जबाबदारीदेखील सिडकोची असल्याच्या कानपिचक्या आमदार मंदा म्हात्रे यांनी दिल्या. त्यावर येत्या वर्षांत सिडकोच्या कामांचे रिझल्ट मिळतील, असे भाटिया यांनी स्पष्ट केले.