‘नवी मुंबईतील विमानतळाचे काम कुठपर्यंत आले आहे. त्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे. विमानतळाची सध्या कोणती निविदा प्रसिद्ध झाली आहे.’ सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांच्या एकामागून एक प्रश्नांवर सिडकोचेच कर्मचारी व अधिकारी अनभिज्ञ असल्याचे भाटिया यांनी नुकताच कर्मचाऱ्यांबरोबर केलेल्या संवादाच्या वेळी दिसून आले. सिडकोतील प्रत्येक कर्मचाऱ्याला सर्व प्रकल्पाविषयी माहिती हवी अशी अपेक्षा व्यक्त करताना यानंतर सिडकोत बिझनेस प्रोसेस री इंजिनीअिरग पद्धत सुरू केली जाणार असल्याचे भाटिया यांनी जाहीर केले.
मार्चमध्ये झालेल्या वर्षपूर्तीनंतर सिडकोचे मिस्टर क्लीन व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी सिडकोतील कर्मचारी व अधिकाऱ्याबरोबर खुला संवाद साधला. त्यावेळी कर्मचाऱ्यांची शाळा घेताना नवी मुंबई विमानतळाविषयी काय माहिती आहे हे विचारण्यात आले. भाटिया यांच्या या प्रश्नावर कर्मचारी अधिकारी एकमेकांकडे बघत राहिले. पण एकही अधिकाऱ्याने(संबधित सोडून) विमानतळाविषयी सद्यस्थिती सांगितली नाही. त्यामुळे आश्र्ययचकित झालेल्या भाटिया यांनी विमानतळ प्रकल्पाचा लवकर टेक ऑफ व्हावा यासाठी सिडको काय प्रयत्न करीत आहे त्याची माहिती दिली. त्याचबरोबर मेट्रो, वाशीतील एक्झीबिशन सेटंर, हाऊसिंग प्रकल्पाविषयी त्यांनी उल्लेख केला. सिडकोतील प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्याला केवळ आपल्याच विभागाचे प्रकल्प लक्षात न ठेवता इतर विभागांची माहिती असणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. सिडकोतील कामकाज अधिक पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी री इंजिनीअिरग करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
वाशी रेल्वे स्थानकाबाहेर उभारण्यात आलेले देशातील सर्वोत्तम प्रदर्शन केंद्राचे काम आता पूर्ण झाले असून त्याचा पुढील आठवडय़ात लोकार्पण सोहळा करण्याचे ठरविण्यात आले आहे. मुख्यमंत्र्याच्या वेळेची प्रतीक्षा आहे. सुमारे दोन लाख चौरस फूट क्षेत्रफळाचे हे प्रदर्शन केंद्र तसेच ७० हजार चौरस फुटाचे बिझनेस सेंटर बांधण्यासाठी ३८० कोटी रुपये खर्च करण्यात आले असून मुंबई पुणे, ठाणे, नवी मुंबईतील उद्योजकांना हे प्रदर्शन केंद्र उद्योगधंद्यांना चालना देणारे ठरणार आहे. या ठिकाणी ४५० वाहनांची पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.