शहरबस सेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी सत्याग्रह आंदोलन केले. तसेच काही काळ शैक्षणिक बंदही पाळण्यात आला.
शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता शहर बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून होत आहे. ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशनने ही मागणी लावून धरली. शहर बससाठी महापालिकेत ठराव घेण्यात आला. परंतु बससेवा सुरू झाली नाही. बससेवा नसल्याने प्रवासाच्या योजना कागदावरच राहिल्या. रेल्वे स्थानक ते झिरोफाटा, बसस्थानक ते विद्यापीठ मार्ग दत्तधाम, पेडगाव ते िपगळी, बसस्थानक ते झरी, औद्योगिक वसाहत ते जिंतूर रोड अशा मार्गावर शहर बस सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थी संघटनेने केली होती. धरणे आंदोलनात पवन कानडे, विकास राठोड, अमोल शेळके, बालाजी गिते, रुपेश महाजन, स्वप्नील गरुड, महेश बारसे आदींनी सहभाग घेतला होता.