सायबर सिटी, इको सिटी, आयटी सिटी, इंड्रस्ट्री सिटी अशी काहीशी ओळख असणाऱ्या नवी मुंबईची आणखी एक ओळख पुढे येत असून, धोकादायक इमारतींचे शहर म्हणून या शहराची एक नवीन ओळख कळत नकळत तयार होत आहे. सिडकोने ४० वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारती जर्जर झाल्या असून, पालिकेच्या लेखी ८१ इमारती शहरात धोकादायक आहेत, पण ही संख्या पाचपट जास्त असल्याचे विविध अहवालांतून स्पष्ट होत आहे.
वाशी सेक्टर-१ मध्ये दोन दिवसांपूर्वी छत कोसळून दोन रहिवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अद्याप रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाशी येथील सेक्टर-१ पासून १० पर्यंत सिडको निर्मित इमारतींची हीच स्थिती आहे. याशिवाय कोपरखैरणे येथील आकाशगंगा, ऐरोली येथील लेक व्ह्य़ू, नेरुळमधील वैष्णवी, खारघर येथील स्पेगटीमधील घरांचे पावसाळ्यात छत कोसळण्याच्या घटना तर नित्यनियमाच्या झाल्या आहेत. या घरांचे छत कोसळून अद्याप जीवितहानी झालेली नाही, हीच काय ती जमेची बाजू असल्याने सिडको जीवितहानी होण्याची वाट पाहात आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. पालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारतींची यादी जाहीर करते. त्यात यावर्षी ८१ इमारतींचा अंतर्भाव करण्यात आहे. मात्र ही यादी तोकडी असून ती केवळ अतिशय धोकादायक इमारतींची आहे. काही इमारतींचा सव्‍‌र्हे करून त्यातील रहिवाशांना संक्रमण शिबिरात पाठविण्यात आले आहे पण शहरात यापेक्षा कैकपटीने अधिक धोकादायक इमारती असून, ग्रामीण भागात आज फिफ्टी फिफ्टी तत्त्वावर तयार होणाऱ्या सर्व इमारती या धोकादायक असल्याचे दिसून येते. जून १९९७ रोजी आयआयटीने वाशीतील २०९ इमारती धोकादायक असल्याचे जाहीर केले आहे. सिडकोने या शहरात एक लाख १९ हजार ९०० घरे बांधली आहेत. त्यातील अंदाजे ३०० इमारती या धोकादायक असल्याचे दिसून येते. याशिवाय खासगी बिल्डरांनी बांधलेल्या एक लाख ५० हजार ५७६ घरांपैकी काही घरे धोकादायक आहेत. क्रिसिल या संस्थेने या घरांचा सव्‍‌र्हे केलेले आहे. याशिवाय राज्य शासनाच्या मिराणी समितीने एप्रिल २००४ रोजी केलेल्या सर्वेक्षणात १२ हजार घरे राहण्यास योग्य नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या घरांना वाढीव एफएसआय देऊन त्यांची पुनर्बाधणी करण्यात यावी, अशा मागणीने गेली कित्येक वर्षे जोर धरला आहे, तरीही राज्य शासनाला त्याचा पाझर फुटत नाही. शहराला वाढीव एफएसआय देण्यात स्थानिक काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकारण आड आलेले आहे, पण या वादात रहिवाशांचा मात्र जीव जात आहे.