गांधी जयंतीच्या निमित्ताने रेल्वेने स्वच्छता मोहीम सुरू केली असली, तरी या मोहिमेच्या दुसऱ्याच दिवशी पहिल्या दिवसाच्या स्वच्छतेवर बोळा फिरल्याचे दिसत आहे. रेल्वे कर्मचारी, विविध सेवाभावी संस्था आणि प्रवासी संघटना यांनी एकत्र येऊन स्वच्छ केलेल्या रेल्वे स्थानकांवर गांधी जयंतीच्या संध्याकाळीच पुन्हा कचरा दिसत होता. प्लॅस्टिकच्या पिशव्या, वेफर्सच्या पिशव्या, रिकाम्या बाटल्या यामुळे संध्याकाळीच ही स्थानके पुन्हा विद्रूप दिसू लागली. त्यातच रेल्वेतून प्रवास करणाऱ्या ‘पिंकबहाद्दरां’नी आपल्या ‘पिंक कले’चे सडे चोहीकडे टाकल्याने या बकालपणात भरच पडली. परिणामी दुसऱ्या दिवशी रेल्वे कर्मचाऱ्यांना ‘पुनश्च हरि ओम’ म्हणून साफसफाईची सुरुवात करावी लागली.
स्वच्छता दिनानिमित्त स्वच्छतेची शपथ घेऊन पश्चिम आणि मध्य या दोन्ही मार्गावर रेल्वे कर्मचारी आणि अधिकारी यांनी श्रमदान केले. त्यांना विविध सेवाभावी संस्था, प्रवासी संघटना आणि काही जागरूक प्रवाशांचीही साथ लाभली. मात्र या मोहिमेकडे काहीशा कुतूहलाच्या नजरेने बघणाऱ्या सामान्य प्रवाशांनी हातातील कागद किंवा पिशव्या फलाटावरच फेकणे पसंत केले होते. परिणामी गुरुवारी सकाळी स्वच्छ आणि चकाचक दिसणारी काही स्थानके संध्याकाळपर्यंत पूर्वावस्थेत पोहोचली होती. कुर्ला, वांद्रे, मालाड, गोरेगाव, कल्याण, डोंबिवली, घाटकोपर, दादर अशा सर्वच स्थानकांवर पुन्हा कचरा दिसत होता. शुक्रवारी सकाळीही स्थानकांची अवस्था हीच होती. मात्र दुपापर्यंत रेल्वे कर्मचाऱ्यांनी पुन्हा ही स्थानके चकचकीत करण्याचा प्रयत्न केला. पादचारी पुलाखाली, जिन्यांखाली आणि फलाटांच्या टोकाला जास्तीत जास्त कचरा असल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांना आढळले आहे. त्याप्रमाणेच फलाटांमध्ये असलेल्या खांबांच्या चौकटीतही खाद्यपदार्थाच्या कागदी प्लेट टाकलेल्या दिसतात. रेल्वेरुळांवर पडणाऱ्या कचऱ्यामुळेही साफसफाई करणारे कर्मचारी हैराण झाले आहेत. उपनगरी मार्गावरील सर्वच स्थानकांमध्ये उंदरांची संख्याही मोठय़ा प्रमाणात आहे. त्यामागे रेल्वेरूळांवर टाकण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थाचा हातभार मोठा आहे.

दोनशेहून अधिक प्रवाशांवर कारवाई
‘स्वच्छता दिनी’ अस्वच्छता केल्यावरून मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांवर २००हून अधिक प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. कचरा फेकणे, रेल्वेरूळांवर थुंकणे, फलाटावर कपडे धुणे, स्वच्छतागृहांऐवजी इतर ठिकाणी लघुशंका करणे अशा विविध अपराधांसाठी या प्रवाशांकडून ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ज्यांच्याकडे दंड भरण्यासाठी पैसे नव्हते, त्यांच्याकडून श्रमदान करून घेण्यात आले, अशी माहिती मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. ही कारवाई दादर, ठाणे, कुर्ला, घाटकोपर अशा सर्वच महत्त्वाच्या स्थानकांवर करण्यात आली.

रेल्वे स्थानकांचा वापर प्रवासीच करतात. त्यामुळे ही स्थानके स्वच्छ ठेवण्यात प्रवाशांचाच वाटा मोलाचा आहे. गुरुवारी स्वच्छ केलेली स्थानके शुक्रवारी पुन्हा अस्वच्छ होणार असतील, तर त्याला रेल्वे कर्मचाऱ्यांचाही नाईलाज आहे. स्थानके स्वच्छ ठेवणे, ही प्रत्येक प्रवाशाने आपली जबाबदारी मानली पाहिजे. प्रवाशांची साथ मिळाल्यास पुढील पंधरवडय़ात स्थानकांचा चेहरामोहरा बदललेला दिसेल.
नरेंद्र पाटील,
मुख्य जनसंपर्क अधिकारी (मध्य रेल्वे)