लहान मुलांच्या हातात सर्रास आयपॅड किंवा टॅब्ज दिसतात. याचे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. या आयपॅड किंवा टॅब्जमुळे मुले ई-बुक्स वाचू लागली आहेत. पण ती कोणती पुस्तके वाचतात यावर पालक नियंत्रण ठेवू शकत नाहीत. यामुळे अनेकदा सातवी-आठवीतली मुले अचानकपणे एखाद्या नको त्या शब्दाचा अर्थ विचारतात आणि पालकांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण करतात. मग मुलांनी संपादित आवृत्ती वाचावी असा विचार सुरू झाला आणि अमेरिकेतील पालकांनी क्लीन रीडर नावाचे अॅप विकसित केले. आपल्या मुलीला आयपॅडमुळे वाचनाची आवड लागली. पण ती जी पुस्तके वाचते त्यात अनेक तिच्या वयाला समजणार नाहीत असे शब्द आहेत. मग आपल्या मुलीला संपादित आवृत्ती कशी वाचता येईल असा विचार जरेड आणि क्रिस्टन मौघन या दांपत्यासमोर उभा राहिला आणि त्यांनी त्यावर काम करण्यास सुरुवात केली. अखेर त्यांच्यासमोर एक अॅप विकसित करण्याचा पर्याय समोर आला. त्यानुसार त्यांनी काम करण्यास सुरुवात केली आणि क्लीन रीडर नावाचे अॅप विकसित केले. या अॅपमध्ये ई-बुक्समधील आक्षेपार्ह शब्द पुसले जातील. या अॅपमध्ये १०० आक्षेपार्ह शब्दांचा समावेश करण्यात आला आहे. यात तीन प्रकार देण्यात आले आहेत. पहिला प्रकार नुसता क्लीन असा आहे तर दुसरा प्रकार क्लीनर आणि तिसरा प्रकार स्क्वेकी क्लीन असा देण्यात आला आहे. यातील प्रत्येक प्रकारामध्ये शब्द पुसण्याची मर्यादा वेगवेगळी आहे. हे अॅप सध्या अॅपल स्टोअर आणि गुगज प्लेवर उपलब्ध आहे.