एक हजार विद्यार्थ्यांना प्रत्येकी ३ हजाराचा निधी
दुष्काळाच्या वणव्यात मराठवाडय़ातील ग्रामीण विद्यार्थ्यांची शैक्षणिक परवड होऊ नये, या उद्देशाने सामाजिक बांधिलकीच्या नात्याने पुढे सरसावत ‘सीएमआयए’ने (चेंबर फॉर मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर) या विद्यार्थ्यांना भरीव आर्थिक मदत केली. जवळपास ४० महाविद्यालयांतील प्रत्येकी २५ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ३ हजार रुपये या प्रमाणे ३० लाख रुपयांची मदत या संस्थेतर्फे देण्यात आली. दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर अशा प्रकारे हास्य फुलविण्याचे कार्य या निमित्ताने ‘सीएमआयए’ ने केल्याची कृतज्ञतेची भावना शिक्षणक्षेत्रातील धुरिणांनी व्यक्त केली.
सन १९७२ पेक्षाही भयावह दुष्काळाने ग्रामीण भाग होरपळून निघत आहे. या भागातील उच्चशिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी दुष्काळाच्या वणव्यात अडकले आहेत. घरच्या परिस्थितीमुळे त्यांची शैक्षणिक परवड होत आहे. मात्र, अशा स्थितीतही त्यांची शिकण्याची उमेद वाखाणण्याजोगी आहे. गावी पिण्याच्या पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य, शेतातील पिके करपलेली, जनावरांची चारा-पाण्याविना होणारी परवड, हाताला काम नाही, डोक्यावर कर्जाचा डोंगर, घरातली कर्ती-धर्ती मंडळी रोजगारासाठी निर्वासित झालेली अशा चक्रात होत असलेली आर्थिक विवंचना, शैक्षणिक वाटचालीवर प्रश्नचिन्ह,    परीक्षा,    करिअरची    चिंता, भविष्याची   अनिश्चिती    असा पाढा या विद्यार्थ्यांना त्रस्त करणारा ठरला आहे.
या पाश्र्वभूमीवर ‘सीएमआयए’ने सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवताना ४० महाविद्यालयांमधील प्रत्येकी २५ गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करून या विद्यार्थ्यांना मोठाच दिलासा दिला. विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास समोर ठेवून, शैक्षणिक, सामाजिक व औद्योगिक क्षेत्रात वैशिष्टय़पूर्ण व नावीन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या, तसेच दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना अशा प्रकारे भरीव आर्तिक मदत करणाऱ्या ‘सीएमआयए’चे हे कार्य अलौकिक असेच असल्याची प्रतिक्रिया शैक्षणिक क्षेत्रातील धुरिणांमधून व्यक्त केली जात आहे. एव्हरेस्ट अभियांत्रिकी महाविद्यालयात सीएमआयएतर्फे दुष्काळग्रस्त सहायता निधीचे धनादेश विद्यार्थ्यांना देण्यात आले.
प्राचार्य शांतिसागर बिरादार यांनी या वेळी बोलताना सर्व शैक्षणिक, स्वयंसेवी संस्था, उद्योग विश्व, सामाजिक व राजकीय संघटनांनी आपसांतील मतभेद बाजूला ठेवून एकोप्याने नियोजनबद्ध प्रयत्न केल्यास या भीषण संकटावर सहज मात करता येईल, असा विश्वास व्यक्त केला.
सीएमआयएचे अध्यक्ष सुनील रायठठ्ठा, उपाध्यक्ष मिलिंद कंक, सचिव प्रा. मुनीष शर्मा यांच्यासह अन्य पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
सिमेंट नालाबांध उभारणार
‘सीएमआयए’च्या वतीने साखळी सिमेंट बंधाऱ्यांची उभारणीही केली जाणार आहे. पहिला बंधारा गंगापूर तालुक्यातील कोराडी येथे बांधण्यात येणार असून, त्याचे भूमिपूजन जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. ३) सकाळी ९.३० वाजता होणार आहे. दुष्काळाच्या दीर्घकाली उपाययोजना करण्यासाठी सिमेंट नालाबांध उभारणीचा निर्णय घेण्यात आल्याचे सीएमआयएचे सचिव मुनीष शर्मा यांनी कळविले आहे.