जोरात वाहणाऱ्या वाऱ्यामुळे नागपूरसह विदर्भात थंडीने जोर धरला आहे. हिवाळा ओसरत असला तरी जोरात वाहणाऱ्या वाऱ्यामुळे ‘विंड चिल्ड फॅक्टर’चा परिणाम जाणवत असल्याचे हवामान जाणकारांचे मत आहे. यानुसार तापमानात जास्त घट न होता थंडीचा अनुभव अधिक येतो.
सकाळी वाऱ्याचा वेग १५ कि.मी. पेक्षा अधिक असल्याने तापमान १३ अंश सेल्सियस असूनही अनुभव मात्र १० अंश सेल्सियसचा येतो.
 सध्या विदर्भात किमान तापमान ११ अंश सेल्सियसच्या वर गेलेले आहे. रविवारी सर्वात कमी तापमान अकोला व गोंदिया येथे ११.४ अंश सेल्सियस नोंदवले गेले, तर सर्वाधिक किमान म्हणजे १६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद चंद्रपुरात केली गेली.
नागपूरचे किमान तापमान १३.१ अंश सेल्सियस होते. हवामान जाणकारांच्या मते, हिमालयात वाहणाऱ्या पश्चिमी वाऱ्यामुळे विदर्भात थंडी वाढली आहे.
जसजसे हे वारे हिमालयाच्या पायथ्याकडे वाहतात तसे विदर्भात खंडीचा जोर वाढतो. सद्यस्थितीत पश्चिमी वारे खाली सरकल्यामुळे थंडी वाढली आहे.
विदर्भात वाऱ्याची दिशा दक्षिण-पश्चिमी झाली आहे. हवामानाच्या अंदाजानुसार आणखी दोन दिवस सकाळच्या वेळेस जोराचे वारे वाहणार असून गारठा कायम राहील.
येत्या बुधवारी नागपूरसह विदर्भात आभाळ अंशत: ढगाळलेले राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बुधवारी विदर्भ विशेषत: दक्षिणी-पूर्व विदर्भ व उपराजधानीत आकाश ढगाळलेले राहण्याची शक्यता आहे.