सप्टेंबर-ऑक्टोबर महिना महाविद्यालयीन स्तरावर एकांकिका स्पर्धाचा महिना मानला जातो. या महिन्यांपासूनच ‘आयएनटी’ या प्रतिष्ठीत स्पर्धेचे पडघम वाजू लागतात. मात्र यंदा काही महाविद्यालयांना या स्पर्धेत आपल्या एकांकिका उतरवता येतील की नाही, याबाबत प्रश्नच आहे. प्रश्न आयोजकांचा नसून रंगभूमी  परिनिरीक्षण मंडळातर्फे देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्राचा आहे. रंगभूमी परिनिरीक्षण महामंडळाचे सचिव निवृत्त झाल्यानंतर येथे पूर्णवेळ सचिव नसल्याने ही प्रमाणपत्रे देण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारी काही मोठय़ा निर्मात्यांकडूनही येत आहेत. त्यामुळे महाविद्यालयातील रंगकर्मीना यंदा हे प्रमाणपत्र मिळवण्यास घाम गाळावा लागणार आहे.
रंगभूमी परिनिरीक्षण मंडळात ४५ सदस्य असतात. मात्र तरीही या मंडळाला एखाद्या नाटकाला प्रमाणपत्र देण्यास दोन ते तीन महिन्यांचा वेळ लागतो. याआधीचे सचिव किमान तात्पुरते प्रमाणपत्र देऊन अडचणीत असलेल्या रंगकर्मीना दिलासा द्यायचे. मात्र सध्या या पदाचा प्रभारी कारभार आरती देसाई सांभाळत आहेत. त्या बऱ्याचदा कार्यबाहुल्यामुळे मंत्रालयात असल्याने रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाच्या कामासाठी त्यांना पूर्ण वेळ देता येत नाही, अशी तक्रार एका ज्येष्ठ निर्मात्यानेच केली आहे.
एकांकिका स्पर्धामध्ये सहभागी होणाऱ्या संस्था, महाविद्यालये आपापल्या संहिता अनेकदा स्पर्धेच्या काहीच दिवस आधी मंडळाकडे पाठवून देतात. त्यातच यंदा पूर्ण वेळ सचिव नसल्याने या संहितांचा पुढील मार्ग गोत्यात येणार आहे. तसेच तात्पुरते प्रमाणपत्र न मिळाल्यास सदर संस्थांना एकांकिका स्पर्धात भागही घेता येणार नाही. त्यामुळे हा तिढा कसा सोडवायचा, हा सध्या रंगभूमी परिनिरीक्षण मंडळापुढील प्रश्न आहे.
याबाबत परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष फ. मुं. शिंदे यांना विचारले असता, त्यांनीही पूर्ण वेळ सचिव नसल्याने कामावर थोडाफार परिणाम होत असल्याचे मान्य केले. मात्र एकांकिका स्पर्धामध्ये उतरणाऱ्या संस्थांची प्रमाणपत्रे वेळेत देण्याचा पूर्ण प्रयत्न आपण करू, असेही त्यांनी सांगितले. तसेच रंगभूमी परिनिरीक्षण मंडळासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आलेला एक पूर्ण वेळ सचिव दिला गेला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.