निवडणूक आचारसंहिता सुरू असताना महापालिकेने २००४ पासून उद्यान देखभाल व दुरूस्तीचे काम करणाऱ्या ज्येष्ठ कामगारांना काम करू देण्यास मनाई करत बेकायदा प्रवेशव्दाराबाहेर काढले. या संपूर्ण प्रकरणात पालिका आयुक्त संजय खंदारे आणि व्यवस्थापक जे. के. कहाने यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचे दिसत असून त्यांच्याविरूध्द कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नाशिक महानगरपालिका श्रमिक संघातर्फे करण्यात आली आहे.
प्रवेशव्दाराबाहेर दुपापर्यंत कामगार बसून होते. दुपारी १२ वाजता व्यवस्थापक कहाने हे तथाकथित ठेकेदार आर. के. प्लॅनर्स यांना घेऊन आले. आणि काम सुरू ठेवण्याचे तोंडी आदेश दिले. कामगारांची उपस्थिती नोंदवून घेण्यात आली. ३१ मार्च रोजी त्आर. के. प्लॅनर्स यांची मुदत संपल्याने या संदर्भात कायदेशीर प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पालिकेने निवडणूक आयोगाला कळविणे आवश्यक होते. एक आणि दोन एप्रिलला कामगार कामावर उपस्थित असतानाही उपस्थिती नोंदविण्यात न आल्याने कर्मचाऱ्यांनी आयुक्तांना उपस्थितीची नोंद करण्यात यावी असे पत्र दिले आहे. उर्वरित दिवसात पुन्हा तथाकथित ठेकेदाराने काम सुरू करण्यास सांगितले. त्यामुळे या कालावधीत काम करूनही कामगारांची उपस्थिती नोंदविण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात आयुक्त खंदारे आणि व्यवस्थापक कहाने यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.