अधिकाधिक नागरिकांनी मतदार यादीत आपली नावे नोंदवावीत, यासाठी निवडणूक आयोग एकीकडे प्रयत्नशील असताना डोंबिवलीतील मतदारांना मात्र वेगळाच अनुभव येत आहे. ज्या मतदारांची नावे चुकीच्या पद्धतीने यादीत नोंदली गेली आहेत ती वगळणे, तसेच ओळखपत्रे मिळविण्यासंबंधीचे काम डोंबिवलीत कै. पु. भा. भावे सभागृहातील निवडणूक कार्यालयात सुरू आहे. या ठिकाणी माहिती देण्यासाठी बसलेल्या सहा महिला कर्मचारी नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे देऊन रिकाम्या हाती माघारी पाठवीत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या असून नोंदणीला हा एकप्रकारे अडथळा असल्याचे चित्र पुढे येऊ लागले आहे.
डोंबिवली विधानसभा परिसरातील मतदार नागरिकांची नोंदणी करण्याचे काम भावे सभागृहातील निवडणूक कार्यालयातून केले जाते. लोकसभा निवडणुकीच्या वेळी अनेक मतदार नागरिकांची नावे यादीतून गायब झाली होती. अनेकांच्या नावात चुका आढळून आल्या होत्या. या सर्व दुरुस्त्या करण्यासाठी तसेच नवीन मतदारांनी यादीत नाव नोंदवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदार नोंदणी अभियान सुरू केले आहे.
*  महिला कर्मचाऱ्यांची अरेरावी
कै. पु. भा. भावे सभागृहातील निवडणूक कार्यालयात यापूर्वी एक महिला कर्मचारी कार्यरत होती. या कार्यालयात गेल्या दोन दिवसांपासून सहा महिला कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचारी मतदार नोंदणी अर्जाचे गठ्ठे घेऊन बसतात. चौकशीसाठी आलेल्या नागरिकाला मात्र मतदार नावनोंदणीचे अर्ज संपले आहेत, एकच अर्ज शिल्लक आहे, अर्जाच्या नकला काढून आणा असे फर्मान सोडले जाते. ‘मला मतदार यादीत नवीन नाव नोंदवायचे आहे’ अशी विचारणा एखाद्याने केली तर ‘तुझे वय कमी आहे. तुझ्याजवळ पॅन कार्ड नाही. तू पुढच्या वर्षी ये’ अशी उत्तर दिले गेल्याच्या तक्रारी आहेत. झोपडपट्टीतून आलेल्या नागरिकांना या सहा महिला कर्मचारी सहकार्य करत नाहीत, असे सांगितले जाते.
*  यादीचा भाग क्रमांक आवश्यक
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी एखाद्या मतदाराने अर्ज भरून दिला तर त्या अर्जात मतदार यादीचा भाग क्रमांक, कुटुंबातील अन्य कोणाचा अनुक्रमांक असल्याशिवाय निवडणूक कार्यालयात अर्ज स्वीकारला जात नाही. या दोन्ही गोष्टी मिळवण्यासाठी अनेक मतदारांना सायबर कॅफे तसेच नगरसेवकांच्या घरी हेलपाटे मारावे लागतात. अनेक नागरिक सायबर कॅफेत जाऊन निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर आपल्या कुटुंब, शेजाऱ्याचे नाव शोधून यादीचा भाग क्रमांक, अनुक्रमांक शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना या दोन्ही गोष्टी मिळत नाही. त्यामुळे या नागरिकांचा हिरमोड होत आहे. एखाद्या नागरिकाने यादीचा भाग क्रमांक, अनुक्रमांक भरून आणला तर त्याला तो क्रमांक बरोबर आहे का? तो बरोबरच असेल कशावरून? अशी उलटतपासणी करून या कर्मचारी बेजार करून सोडतात, असे काहींनी सांगितले. मतदार नोंदणी अर्ज मराठी किंवा इंग्रजीतून भरा अशी कोणतीही स्पष्ट सूचना या कर्मचारी देत नाहीत. त्यामुळेही नागरिक गोंधळून जात आहेत.
*  मतदारांना सहकार्य
या मोहिमेचे नियंत्रण अधिकारी नायब तहसीलदार ठाकूर यांनी सांगितले की, मतदार नोंदणी अभियानाच्या जागरूकतेसाठी सर्व राजकीय पक्ष, संघटना यांना सीडी रूपात माहिती देण्यात आली आहे. ज्या नागरिकांना यादीत नाव नोंदवण्यासाठी काही अडचण येत असेल तर त्यांनी थेट आपल्याशी संपर्क साधावा. कोणीही नागरिक नाव नोंदणीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता आम्ही घेत आहोत. निवडणूक कामासाठी कायमस्वरूपी कर्मचारी नाही. त्यामुळे काही कर्मचारी वर्ग बाहेरून घेण्यात आला आहे. महिला कर्मचाऱ्यांकडून कोणतीही अडवणूक केली जात नाही, असा दावाही त्यांनी केला.