महायुती आणि आघाडी यांच्यात जागा वाटपाच्या मुद्यावरून होणाऱ्या खेचाखेचीमुळे विधानसभा निवडणुकीची चर्चा हळूहळू रंगतदार होत असताना चांदवड मतदारसंघात उमेदवारीवरून तीव्र संघर्ष उभा राहण्याची चिन्हे दिसत आहेत.
विद्यमान आमदार शिरीष कोतवाल यांची भूमिका काय राहील याविषयी वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत. लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघात छगन भुजबळ यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी चांदवड मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवावी, असा आग्रह राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी केला होता. त्यामुळेही चांदवड मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले असताना महायुती आणि आघाडी यांच्यात जागावाटपावरून होणारे वाद सर्वच पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अस्वस्थ करीत आहेत. अलीकडेच नाशिकमध्ये भाजपचे प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार तसेच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे येऊन गेले. या तिघा नेत्यांनी आपआपल्या पदाधिकाऱ्यांना निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. जागा वाटपात काही बिघाडी होऊन स्वबळावर निवडणूक लढविण्याची परिस्थिती निर्माण झालीच तर ऐनवेळी उमेदवार शोधण्याची धावपळ नको म्हणून सर्वच पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी करण्यात येत आहे.
उध्दव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या विभागीय मेळाव्यात त्यासंदर्भात स्पष्टपणे निर्देश दिल्याने चांदवड मतदारसंघातील शिवसेनेच्या इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. तीच गत राष्ट्रवादी आणि भाजपच्या गोटातही आहे. विद्यमान आमदार कोतवाल यांनी अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नसल्याने बदलत्या राजकीय परिस्थितीत ते कोणत्या पक्षाला जवळ करतात याकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लक्ष आहे.