News Flash

लोकसभा निवडणुकीसाठी वध्र्यातून भाजपतर्फे चार नावांवर दिल्लीत चर्चा

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी वर्धा मतदारसंघातून भाजपतर्फे चार नावांवर दिल्लीत चर्चा सुरू असून यापैकी काही अनपेक्षित अशी नावे पुढे आली आहेत.

| November 15, 2013 07:41 am

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी वर्धा मतदारसंघातून भाजपतर्फे  चार नावांवर दिल्लीत चर्चा सुरू असून यापैकी काही अनपेक्षित अशी नावे पुढे आली आहेत. प्रदेश भाजप समितीने सुचविलेल्या नावांपैकी ही चार नावे पक्षाध्यक्ष राजनाथसिंह व पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यापुढे विचारार्थ आहेत. माजी आमदार रामदास तडस, माजी खासदार सुबोध मोहिते, आमदार प्रवीण पोटे व माजी खासदार सुरेश वाघमारे ही चार नावे अग्रक्रमावर चर्चेत आहेत.
वर्धा लोकसभा मतदारसंघातून यापूर्वी भाजपतर्फे विजय मुडे व सुरेश वाघमारे लोकसभेत पोहोचले आहेत. तसेच अन्य लोकसभा निवडणुकीत भाजपच द्वितीय स्थानावर राहिल्याने वर्धा मतदारसंघ भाजपसाठी गड समजला जातो. हा गड येनकेनप्रकारे या वेळी जिंकायचाच, अशा ईर्षेने भाजपचे केंद्रीय नेतृत्व कामाला लागले आहे. देशभरातून जिंकू शकणाऱ्या हमखास दोनशे जागांमध्ये भाजप नेत्यांनी वध्र्याचा समावेश केला आहे. याच पाश्र्वभूमीवर वध्र्याबाबत दिल्लीत आठवडय़ापूर्वी विचारमंथन झाले. माजी आमदार रामदास तडस यांचे नाव सर्वात आघाडीवर असल्याचे समजते. दोन वेळा स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार राहिलेल्या तडसांनी गत वेळी राज्यमंत्री रणजित कांबळे यांच्याशी जोरदार टक्कर दिली होती. एकहाती देवळीची नगरपरिषद भाजपला मिळवून देणाऱ्या तडसांचे कार्यक्षेत्र देवळी-पुलगावात राहिले असले तरीही तेली समाज संघटनेच्या कार्यामुळे ते सर्वत्र पोहोचल्याचे पक्षश्रेष्ठी मानतात. या मतदारसंघातील, तसेच विदर्भातील तेलीबहुल पट्टय़ातील मतदारांना तडस हे आकर्षण ठरून त्याचा फोयदा अन्य मतदारसंघात होण्याचा होरा पक्षाने ठेवला आहे. जानेवारीत नागपुरात त्यांच्याच नेतृत्वाखाली तेली समाजाचा मेळावा घेऊन शक्तिप्रदर्शनाचा डाव नितीन गडकरींनी मांडला आहे, पण तडसांची यास ना आहे. मेघे कुटुंबाविरोधात लढणार नसल्याचे स्पष्ट करणाऱ्या तडसांनी एकप्रकारे पक्षश्रेष्ठींनाच आव्हान दिले असले तरीही तडसांच्या नावावर नरेंद्र मोदी आग्रही असल्याची पक्षवर्तुळातील चर्चा आहे.
अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपतर्फे  आमदार झालेले प्रवीण पोटे यांचे नाव अनपेक्षितपणे पुढे आले आहे. शैक्षणिक पसारा व बांधकाम व्यवसायाने परिचित पोटे हे भाजपचे निष्ठावंत नसले तरी काँग्रेसच्या तगडय़ा उमेदवाराविरोधात ते दमदार लढत देऊ शकतात, अशा भूमिकेने त्यांचे नाव पुढे आले आहे. पक्ष मजबूत करण्यासाठी असे तगडे उमेदवार शोधून त्यांच्या दिमतीला निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी देण्याचे राजकारण अलीकडच्या काळात भाजप नेतृत्वाने स्वीकारल्याचे दिसून आले आहे. प्रवीण पोटे हे एक असेच नाव आहे. अद्याप काँग्रेसमध्येच असणाऱ्या व काँग्रेसचे वर्धा जिल्हा प्रभारीपद भूषविणाऱ्या मोहितेंकडे एक तगडा उमेदवार म्हणून भाजपची दृष्टी आहे. स्वत: मोहितेंनी भाजप नेतृत्वाकडे तशी इच्छा प्रकट केली आहे. केंद्रीय मंत्रीपद भूषविणारे मोहिते दिल्लीत विदर्भ भाजपची जोरदार भूमिका मांडू शकतात, असा होरा ठेवून त्यांना यादीवर घेण्यात आले.
माजी खासदार सुरेश वाघमारे यांची संभाव्य उमेदवारी नेहमीच चर्चेत असते. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ऑगस्टमध्ये मोठा लढा उभारून ते चर्चेत आले, पण जिल्हा संघटनेतील गटबाजीत त्यांना विरोध करणारा एक मोठा गट असून वाघमारेंनी पक्षासाठी काय केले, अशा तक्रारी त्यांच्याविरुद्ध नेहमीच वाचल्या जातात, पण तडसांच्या नकारावर तेली समाजाचा उमेदवार देण्याची बाबच महत्त्वाची ठरली, तर वाघमारेंचा पर्याय असावा म्हणून त्यांचेही नाव संभाव्य चारमध्ये आले आहे.
या चार नावांवर दिल्लीत चर्चा झाल्याच्या वृत्तावर दुजोरा देणाऱ्या रामदास तडस यांनी याविषयी कसलेच भाष्य करण्यास नकार दिला. या चार नावांखेरीज भाजपतर्फे  निवडणूक लढण्यास अन्य इच्छुक आहेत, पण सध्या या चार जणांच्या विजय-पराजयाची शक्यता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून तपासली जात असल्याने अन्य इच्छुकांचा जीव टांगणीला लागल्याचे दिसून आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2013 7:41 am

Web Title: congress focuses on four names for vardha constituency in delhi
टॅग : Congress
Next Stories
1 सोनिया गांधींच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमासाठी काँग्रेसची जय्यत तयारी
2 नागपूर शेगाव रेल्वे सुरू करण्याची मागणी
3 ‘रातुम’ नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा गोंधळात सुरू
Just Now!
X