04 August 2020

News Flash

कॉँग्रेसचा ‘अन्य नावांचा पर्याय’ सुचवण्याच्या आग्रहाने इच्छुक पेचात

आतापासून लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू करणाऱ्या कॉंग्रेसने इच्छुक उमेदवारांना अन्य नावांचा पर्याय सुचवण्याचा आग्रह एका प्रश्नावलीतून धरल्याने लढण्यास इच्छुक असलेल्या अनेकांची गोची झाली आहे.

| November 28, 2012 12:57 pm

आतापासून लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू करणाऱ्या कॉंग्रेसने इच्छुक उमेदवारांना अन्य नावांचा पर्याय सुचवण्याचा आग्रह एका प्रश्नावलीतून धरल्याने लढण्यास इच्छुक असलेल्या अनेकांची गोची झाली आहे. ही गुगली कशी परतवून लावायची, असा प्रश्न आता नेत्यांना पडला आहे.
 लोकसभेच्या निवडणुकीला अद्याप दोन वर्षांचा कालावधी असला तरी कॉंग्रेसने आतापासूनच राज्या राज्यात निरीक्षक पाठवायला सुरुवात केली आहे. या निरीक्षकांच्या माध्यमातून संभाव्य उमेदवारांची नावे समोर येणार आहेत. त्यावर पक्षश्रेष्ठी विचार करून अंतिम निर्णय घेणार आहेत. विदर्भाची जबाबदारी असलेले पक्षाचे निरीक्षक रूद्रा राजू नुकतेच या भागाचा दौरा करून गेले. या दौऱ्यात त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या अनेकांच्या भेटी घेतल्या. या भेटीत या सर्वाकडून अखिल भारतीय कॉंग्रेस समितीने तयार केलेली एक प्रश्नावली भरून घेण्यात आली. या प्रश्नावलीतील प्रश्नांनी अनेक इच्छुकांची पंचाईत केली आहे. यात इच्छुकांना स्वत:विषयीची संपूर्ण माहिती द्यायचीच आहे, सोबत मागील निवडणुकीत पराभव का झाला, याची कारणेही नमूद करायची आहेत. गेल्या निवडणुकीतील उमेदवार कोण होते, त्यांची काम करण्याची पध्दत कशी होती, पराभवाला ते किती जबाबदार आहेत, या ही प्रश्नांची उत्तरे या इच्छुकांना यावेळी द्यावी लागली.
उल्लेखनीय म्हणजे, कॉंग्रेसने याच इच्छुकांना तुमच्या व्यतिरिक्त आणखी कोणत्या तीन उमेदवारांमध्ये निवडून येण्याची क्षमता आहे, असाही प्रश्न विचारला आहे. या तिघांची नावे नमूद करण्याचा आग्रह या प्रश्नावलीत धरण्यात आला आहे.
राजकारणात आपणच कसे श्रेष्ठ आहोत, हे सांगण्याची मोठी परंपरा आहे. कॉंग्रेसचे नेते याच परंपरेचे पाईक आहेत. त्याला छेद देण्याचा प्रयत्न यावेळी कॉंग्रेसने या प्रश्नावलीच्या माध्यमातून केला आहे. त्यामुळे पक्षाने ठरवलेल्या या प्रश्नांची उत्तरे देतांना इच्छुक उमेदवारांना नाईलाजाने इतरांची नावे नमूद करत त्यांची स्तुती करावी लागली आहे. याशिवाय, पक्षाने गुन्हे किती दाखल आहेत, हाही प्रश्न प्रत्येक इच्छुकांना विचारला आहे.
उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या नेत्यांना मतदार संघातील जातीनिहाय राजकारणाची कल्पना कितपत आहे, याचीही चाचपणी या माध्यमातून करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. मतदार संघात कोणत्या जातीची किती मते आहेत, त्यांचा निवडणुकीत कितपत प्रभाव पडू शकतो व इच्छूक उमेदवार नेमका कोणत्या जातीचा आहे, याचीही माहिती कॉंग्रेसने या माध्यमातून गोळा करणे सुरू केले आहे.   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2012 12:57 pm

Web Title: congress serching and adding more names intrested comes in more problem
टॅग Congress
Next Stories
1 कृषी विद्यापीठात सत्ताबाह्य़ केंद्राचा वावर
2 देवगिरीबाबत अनिश्चितता; नागभवन सज्ज
3 सुरक्षा जवानांची नक्षलवाद्यांशी चकमक
Just Now!
X