भांडवली मूल्याधारित करप्रणाली न्यायपप्रविष्ट असल्याने सहा महिन्यांच्या देयकाची पद्धत
यंदाच्या वर्षांपासून ठाणे महापालिकेने ठाणेकरांना सहा महिन्यांची मालमत्ता कराची बिले पाठविण्यास सुरुवात केली आहे. मात्र, त्यामुळे ठाणेकरांना वार्षिक मालमत्ता कराच्या बिलामध्ये मिळणाऱ्या सवलतीपासून वंचित राहावे लागणार आहे. तसेच मालमत्ता कराची वार्षिक बिले काढण्याऐवजी सहा महिन्यांची करण्यात आली असल्याने महापालिकेस मालमत्ता कराच्या बिले छपाईसाठी दोनदा खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या नियोजनशून्यतेमुळे महापालिकेस तसेच नागरिकांना आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे.
ठाणे महापालिकेने यंदाच्या आर्थिक वर्षांच्या मालमत्ता कराची बिले नागरिकांना पाठविण्यास सुरुवात केली असून ही बिले केवळ सहा महिन्यांच्या कालावधीची आहेत. ठाणेकरांकडून महापालिका मालमत्ता कराची आगाऊ बिले वसूल करण्यात येतात. त्यामुळे यापूर्वी महापालिका मालमत्ता कराची वार्षिक बिले काढत होती. मात्र, यंदाच्या वर्षांपासून महापालिकेने नवी पद्धत अवलंबली असून त्यामध्ये सहा-सहा महिन्यांची बिले काढण्याचे ठरविले आहे. त्याची अंमलबजावणीही करण्यात आली असून आता ठाणेकरांना सहा महिन्यांची बिले पाठविण्यास सुरुवात झाली आहे. तसेच वार्षिक बिले ही मार्च-एप्रिल महिन्यात आगाऊ रवाना व्हायची, त्यामुळे त्या बिलामध्ये दोन ते पाच टक्के सूट मिळत होती. परिणामी, ठाणेकरांकडून त्याला प्रतिसाद मिळत असल्याने महापालिकेच्या कोषात भर पडत होती. मात्र, सहा-सहा महिन्यांच्या बिलामध्ये आगाऊ रक्कम भरल्यास कोणत्याही सवलती मिळत नाहीत. त्यामुळे ठाणेकरांना या सुविधांपासून वंचित राहावे लागणार आहे. या सवलती मिळाव्यात, यासाठी ठाणेकर बिल आगाऊ भरत होते. मात्र, नव्या पद्धतीमध्ये अशा सुविधाच उपलब्ध नाही. त्यामुळे त्याचा परिणाम महापालिकेच्या आर्थिक व्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे. तसेच सहामाही मालमत्ता कराची बिले पाठविण्यासाठी एप्रिलऐवजी जून महिना उजाडला आहे, अशी माहिती दक्ष नागरिक चंद्रहास तावडे यांनी दिली. भांडवली मूल्यावर आधारित कर प्रणाली लागू करण्यासंबंधीचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने महापालिकेच्या कर विभागाने मालमत्ता करासाठी सहा-सहा महिन्यांची नवी पद्धत सुरू केली आहे, अशी माहिती चौकशीदरम्यान कर विभागानेच दिली असून त्यांचे हे कारण तकलादू आहे, असेही त्यांनी सांगितले. वर्षांतून दोनदा मालमत्ता कराची बिले काढायची असल्याने महापालिकेला आता बिले छपाईसाठी दोनदा खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे महापालिकेला आणि पर्यायाने नागरिकांना आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे, असेही त्यांनी सांगितले. या संदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे लेखी पत्राद्वारे या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.