करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरातील प्रथांबाबत उठसुठ आंदोलन करणे चुकीचे आहे. आमदार राम कदम यांनी अशाप्रकारचे आंदोलन केल्यानंतर आता त्यांची कशी वाताहत झाली आहे, हे सर्वजण पहातच आहेत. विधीमंडळातून त्यांना निलंबित करण्यात आले, त्यांचे पोलीस संरक्षणही काढून घेण्यात आले आहे. आता आमदार कदम यांची अवस्था बेवारसासारखी झाली आहे, अशी टीका शिवसेनेचे नेते आमदार दिवाकर रावते यांनी शनिवारी मनसेचे आमदार राम कदम यांना लगावला.
    येथील प्रायव्हेट हायस्कूलच्या प्रांगणात शनिवारपासून तीन दिवस चालणाऱ्या भगिनी महोत्सवाला प्रारंभ झाला. शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या भगिनी मंचच्यावतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटनप्रसंगी आमदार रावते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर जयश्री सोनवणे होत्या.
    महालक्ष्मी मंदिरातील गाभाऱ्यामध्ये महिलांना मासिक धर्माच्या कारणावरून प्रवेश देण्यास विरोध झाला होता. तेंव्हा आमदार कदम यांनी या प्रकाराविरूध्द आंदोलन छेडून महिलांना गाभाऱ्यात प्रवेश देण्याचा मार्ग उपलब्ध करून दिला होता. या आंदोलनाचा संदर्भ घेत आमदार रावते यांनी टिका केली. ते म्हणाले,
हातामध्ये शस्त्र घेतलेली महालक्ष्मी देवी स्वतचे रक्षण करण्यास समर्थ आहे. मंदिरातील प्रथा परंपराबाबत देवी व भक्त यांच्यातील संकेत ठरलेले आहेत. तरीही मंदिरातील उठसुट आंदोलन करणे चुकीचे आहे.
असे करणाऱ्यांना देवीकडून धडा मिळत असतो. राम कदम यांनी अशाप्रकारचे आंदोलन केल्यानंतर आता त्यांची परिस्थिती किती वाईट झाली आहे, हे सर्वाना कळून चुकले आहे.
    खरेतर आमदार रावते यांना शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार व विजय देवणे यांना लक्ष्य करायचे होते. महालक्ष्मी मंदिरात या दोघांनी रिव्हॉल्वर घेवून प्रवेश केला होता. शस्त्रधारी देवीच्या मंदिरात शिवसैनिकांनी शस्त्र घेवून जाण्याचे कारण काय असा प्रश्न आमदार रावते यांना विचारला असतांना त्यांनी सोयीस्करपणे बगल दिली. मात्र त्यांचा मुळ निषाणा जिल्ह्य़ातील प्रमुख पदावर असलेल्या जोडगोळीवर होता, याची कार्यक्रमस्थळी चर्चा होती.  पवार-देवणे यांनी कांही दिवसांपूर्वी रावते हे जिल्ह्य़ामध्ये पक्षपाती
भूमिका घेतात असा आरोप करीत त्यांना घेराओ घालण्यासह टिकेचे लक्ष्य केले होते.
    भगिनी महोत्सवामध्ये आमदार चंद्रकांतदादा पाटील, आमदार चंद्रदिप नरके, आमदार भगवानराव साळुंखे, आमदार डॉ.सुजित मिणचेकर, महापौर जयश्री सोनवणे, नगरसेवक आदिल फरास आदींची भाषणे झाली. आमदार क्षीरसागर यांनी ताराराणी गारमेंटचा विस्तार करण्यात येणार असून आणखी २० प्रकल्प सुरू केले जाणार असल्याचे सांगितले. भगिनी मंचच्या अध्यक्षा वैशाली क्षीरसागर यांनी प्रास्ताविक केले.
शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरूण दुधवाडकर यांच्याहस्ते शिवसेना प्रमुखांची पहिली पूर्णाकृती प्रतिमा साकारणारे ब्रम्हानंद वडगांवकर यांचा सत्कार करण्यात आला. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महिला बचतगटाच्या तसेच व्यावसायिकांच्या प्रदर्शनाला महिला व नागरिकांचा प्रतिसाद मिळाला.