मराठी व्यंगचित्रकार अल्पसंख्य असले तरी त्यांच्या संमेलनाला या पुढे राजाश्रय निश्चित मिळवून देऊ, त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री व पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी दिली.
येथील कुसुम सभागृहात १६वे अ. भा. मराठी व्यंगचित्रकार संमेलनाचे उद्घाटन पालकमंत्री सावंत यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर स्वागताध्यक्ष आमदार शंकरअण्णा धोंडगे, ओमप्रकाश पोकर्णा, कार्टूनिस्ट कंबाईन्सचे अध्यक्ष प्रभाकर वाईरकर, मुख्य संयोजक बाबू गंजेवार, सांस्कृतिक मंचचे लक्ष्मण संगेवार उपस्थित होते.
प्रारंभी कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राला सावंत यांनी पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने उद्घाटन केले. तसेच उपस्थित मान्यवरांचे शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.या वेळी सावंत म्हणाले की, व्यंगचित्रकलेची ताकद फार मोठी आहे. या संमेलनाच्या लोगोतील चित्रात रबरी ठोसा आहे, असे सांगण्यात आले. परंतु त्याचा ठोसा रबरी असला तरी त्याची जखम फार काळ दुखत राहते, असे नमूद करीत पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी व्यंगचित्रकलेचा प्रचार व प्रसार आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. या संमेलनाला या पुढे राजाश्रय (आर्थिक मदत) मिळवून देण्याची ग्वाही देत ते म्हणाले की, व्यंगचित्रकला हा कौशल्य विकासाचाच भाग आहे.
बहुतांश वेळा राजकारणी हेच व्यंगचित्रकारांचे खास लक्ष्य असते. त्याचा काही राजकारण्यांना रागही येतो. आम्ही त्यातले नाही. परंतु आम्हीही माणसेच आहोत. आमच्या वाईट बाजूंवर टीका करताना चांगल्या बाजूंवरही प्रकाश टाकावा, असे आवाहनही त्यांनी केले.