सभागृहाने व नागरिकांनी मांडलेल्या सूचनांचा विचार करून वाढीव भागाचा प्रारूप विकास आराखडा तयार करण्याचा ठराव कराड पालिकेत एकमताने पारित करण्यात आला. पालिका कार्यक्षेत्रातील वाढीव हद्दीतील प्रारूप विकास आराखडा तयार करण्याबाबतच्या पत्रासंदर्भात चर्चा करण्यासाठी सभागृहात खास सभा बोलावण्यात आली होती. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा प्रा. उमा हिंगमिरे होत्या.
प्रारूप विकास आराखडा तयार करण्याचा ठराव सत्ताधारी लोकशाही आघाडीचे प्रमुख सुभाष पाटील यांनी मांडला. विरोधी आघाडीचे ज्येष्ठ नगरसेवक विनायकराव पावसकर यांनी यासंदर्भात उपसूचना मांडल्या. त्यावर पावसकर म्हणाले, की शहराच्या वाढीव भागाचा विकास आराखडा तयार करताना सत्ताधा-यांनी विरोधी सदस्यांना विश्वासात घेतले पाहिजे. हा आराखडा दूरगामी असल्याने त्याबाबत निर्णय घेताना विरोधी सदस्यांसह नागरिकांची मते आवश्यक आहेत. शहराच्या मूळच्या आराखडय़ात राहिलेल्या सर्व त्रुटी नवीन आराखडा तयार करताना विचारात घेतल्या पाहिजेत. तसेच, आराखडय़ाचे आरक्षण टाकताना कोणावरही अन्याय होता कामा नये.