परभणी जिल्हा सहकारी बँकेच्या कोअर बँकिंग प्रणालीचे उद्घाटन उद्या (शुक्रवारी) सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते होणार आहे. परभणी व िहगोली जिल्ह्यातील १०३ शाखा ऑनलाईन झाल्याने शेतकरी सभासदांना बँक व्यवहार कुठल्याही शाखेत करता येणार असल्याची माहिती प्रभारी अध्यक्ष सुरेश देशमुख यांनी दिली.
सहकार राज्यमंत्री सुरेश धस, राज्यमंत्री फौजिया खान, खासदार गणेशराव दुधगावकर व सुभाष वानखेडे, आमदार जयप्रकाश दांडेगावकर, रामप्रसाद बोर्डीकर, राजीव सातव, सीताराम घनदाट, भाऊ पाटील गोरेगावकर, संजय जाधव, मीरा रेंगे, अब्दुल्ला खान दुर्राणी आदी उपस्थित राहणार आहेत. बँकेच्या मुख्य कार्यालयात दुपारी साडेबारा वाजता कार्यक्रम होणार आहे.
मराठवाडय़ात लातूरनंतर कोअर बँकिंग झालेली परभणीची ही दुसरी बँक आहे. कोअर बँकिंगचे काम विप्रो कंपनीने केले. नाबार्डकडून संगणक लॅब उभारणीसाठी ९ लाख रुपये मिळाले. नुकतीच बँकेने यस बँकेच्या सहकार्याने आरटीजीएस/एनएफटी सेवा सुविधा देण्यास सहसदस्यत्व प्राप्त करून घेतले. परभणी मध्यवर्ती बँकेस आयएफएससी कोड मिळाला आहे. भविष्यात एटीएम व शेतकऱ्यांसाठी रुपीकार्ड सुविधा पुरविणार आहे, अशी माहिती देशमुख यांनी दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. जी. जाधव, संचालक स्वराजसिंह परिहार उपस्थित होते.