विजयादशमीचे सीमोल्लंघन होताच महानगरपालिकेच्या निवडणूक हालचालींना जोरदार वेग येण्याची चिन्हे आहेत. शहरातील प्रमुख नेत्यांनी मुले किंवा पत्नी यांना रिंगणात उतरवण्याची तयारी केल्याने यंदाची निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. कुटुंबातील या उमेदवारांच्या जय-पराजयावर या नेत्यांचे अगदीच भवितव्य ठरणार नसले तरी पुढच्या राजकारणाची दिशा मात्र स्पष्ट होऊ शकेल.
खासदार दिलीप गांधी यांचा मुलगा सुवेंद्र, आमदार अनिल राठोड यांचा मुलगा विक्रम, मनसेचे नेते आमदार अरूण जगताप यांचा मुलगा तथा माजी महापौर संग्राम जगताप, वसंत लोढा यांच्या पत्नी तथा माजी नगराध्यक्ष लता लोढा असे कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागणारे उमेदवार यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे अपवाद वगळता या सर्वच वजनदार उमेदवारांना त्यांच्या प्रभागात कडवा संघर्ष करावा लागेल असेच दिसते. त्यामुळेच या लढती जिल्ह्य़ात लक्षणीय ठरण्याची चिन्हे आहेत.
खासदार गांधी गेल्या पाच वर्षांपासून वर्षांपासून चिरंजीव सुवेंद्र यांना ‘लाँच’ करण्याच्या प्रयत्नात आहेत. भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून ते शहराच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. मनपाच्या येत्या निवडणुकीत लोकांमध्ये जाऊन निवडणुकीच्या राजकारणाचा श्रीगणेशा करतील. पंचवीस वर्षांपुर्वी सन १९८५ मध्ये स्वत: गांधी यांचा ज्या प्रभागातून राजकीय उदय झाला, त्या प्रभाग क्रमाक २० मधून सुवेंद्र यांना मनपात आणण्याचा गांधी यांचा प्रयत्न आहे. मात्र मूळचे शिवसेनेचे व तडजोडीत सध्या भाजपचे नगरसेवक असलेले संजय चोपडा यांचे या प्रभागात त्यांना मोठे आव्हान आहे. भाजप-शिवसेना युतीच्या जागावाटपात ही जागा भाजपला म्हणजेच सुवेंद्र यांना गेली तर, चोपडा अपक्ष म्हणुनही दोन हात करू शकतात. खासदार गांधी यांनी सन ८५ मध्ये शहराच्या विकासाचे शिल्पकार नवनीतभाई बार्शिकर यांचा या प्रभागात पराभव केला होता, त्यावेळी गांधी ‘जायंट किलर’ ठरले होते.
आमदार राठोड यांचे चिरंजीव युवा सेनेच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय झाले आहेत. तेही आता क्रमांक २१ या प्रभागातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. गेले काही दिवस याबाबत दबक्या आवाजात ही चर्चा सुरू होती, मात्र आता त्यांनी थेट प्रचारालाच सुरूवात केली आहे. त्यांचे स्वत:चे घरही याच प्रभागात असून हा शहराच्या मध्यवस्तीतील हा भाग युतीचा प्रामुख्याने भाजपचा बालेकिल्ला म्हणुन ओळखला जातो. मात्र या निवडणुकीत त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ व प्रभावशाली नगरसेवक किशोर डागवाले यांच्याशी कडवा संघर्ष करावा लागेल. राठोड यांचे नाव चर्चेत येईपर्यंत डागवाले तुलनेने निर्धास्त होते, मात्र आता त्यांनाही आता बाजी लावावी लागेल. राठोड यांच्या दृष्टीने मुलाचे ‘लाँचिंग’ आणि पंचवीस वर्षांच्या आमदारकीचे वलय अशी दुहेरी प्रतिष्ठा येथे पणाला लागणार आहे. स्वत:चाच प्रभाग, शिवाय मुलगाच उमेदवार यामुळे त्यांना त्याला विजयी करावेच लागेल. विक्रम यांनी याआधी सारसनगर भागातून मनपाची पोटनिवडणूक लढवली होती, मात्र ती प्रतिकात्मक लढाई होती. आता पिता-पुत्रांची कसोटी लागेल.
याच प्रभागातील महिला जागेवर मनसेचे नेते वसंत लोढा यांच्या पत्नी तथा माजी नगराध्यक्षा लता लोढा रिंगणात उतरण्याची चिन्हे आहेत. आमदार राठोड यांच्याशी पारंपारिक विरोध कायम ठेवताना मनसेत आल्यानंतरही लोढा यांनी त्यांनाच लक्ष्य केले आहे. येत्या विधानसभा निवडणुकीतच मनसेच्या वतीने उतरण्याचा मनसुबा ते राखून आहेत. त्यामुळेच शिवसेनेकडून त्यांच्याही विरोधात मोठी ताकद लावली जाईल. राठोड-लोढा यांच्यातील पारंपारिक विरोधाची मूळ किनार या निवडणुकीला आहेच, शिवाय श्रीमती लोढा यांची लढत भाजपचे माजी नगरसेवक नरेंद्र कुलकर्णी यांच्या पत्नी गायत्री कुलकर्णी यांच्याशी आहे. अर्थात लोढा यांची उमेदवारीबाबत अजुनही साशंकताच व्यक्त होते.
प्रभाग क्रमांक २९ मधून आमदार अरूण जगताप यांचे चिरंजीव तथा राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संग्राम जगताप पुन्हा रिंगणात उतरणार आहेत. गेल्या वेळी पदार्पणातच त्यांनी महापौरपदी आरूढ होऊन राजकारणाचा जोरदार श्रीगणेशा केला. आताही ते रिंगणात असले तरी वरील अन्य नेत्यांच्या कुटूंबियांसारखा त्यांना पारसा संघर्ष करावा लागणार नाही अशीच सध्याची स्थिती आहे. अन्य या तीन नेत्यांना मात्र कुटुंबातील सदस्यांच्या विजयासाठी प्रतिष्ठाच पणाला लावावी लागणार आहे. येथील निवडणुका अटीतटीच्याच होण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे राठोड, गांधी व लोढा या तिघांचेही प्रभाग शहराच्या मध्यवस्तीत आहेत. त्यामुळे जिल्ह्य़ाचे लक्ष या भागाकडे असेल.